Thursday, 29 Oct, 10.19 pm My महानगर

महाराष्ट्र
राष्ट्रवादीने आमदारकी-खासदारकी दिली तर आनंदच, खडसेंनी सांगितली मन की बात

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे यांना राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदारकी दिली जाणार अशी चर्चा आहे. यासंदर्भात एकनाथ खडसे यांना विचारले असता त्यांनी आपण राष्ट्रवादीकडे कोणत्याही पदाची अपेक्षा केली नसून आमदारकी-खासदारकी मागितलेली नाही. पण पक्षाने ती दिली तर आनंदच आहे, असेही खडसे यांनी म्हटले. त्यामुळे आपण आमदारकी-खासदारकीसाठी देखील इच्छुक असल्याचे खडसे यांनी अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादीला सूचित केले आहे.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना कोणते पद दिले जाणार अशी मोठी चर्चा होती. मात्र खडसे यांनी कोणतीही अपेक्षा केलेली नसून ते महाराष्ट्रातील जनतेसाठी काम करणार आहेत. त्यामुळे पक्षात कोणतेही बदल होणार नसल्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले होते. असे असतानाच राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावांची चर्चा आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला चार जागा आल्या असून त्यांनी आपल्या सदस्यांची यादी तयार केली आहे. यामध्ये एकनाथ खडसे, आनंद शिंदे, आदिती नलावडे, शिवाजी गर्जे या नावांची चर्चा आहे. तर आता एकनाथ खडसे यांनी देखील आपल्याला आमदारकी-खासदरकी मिळाली तर आनंदच आहे, असे म्हटले आहे. पद मिळाले तरी काम करणार नाही मिळाले तरी कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, यावेळी एकनाथ खडसे यांनी भाजप आमदार गिरीश महाजन यांनाही टोला लगावला. खडसे यांच्या जाण्याने भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही. तसेच कोणताही नेता भाजपला सोडून जाणार नाही, असे गिरीश महाजन यांनी म्हटले काल म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना खडसे म्हणाले, कुणाच्या मागे कोण आहे आणि कोण सक्षम आहे आगामी काळात कळेलच. पक्षातील कार्यकर्ते सोडून जाऊ नये म्हणून, असे विधान करावे लागतात, असा टोलाही त्यांनी गिरीश महाजन यांना हाणला.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top