Friday, 11 Jun, 7.11 am My महानगर

होम
रायगडातील धबधब्यांवर नो एन्ट्री!

पावसाळ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणावर धबधबे किंवा तलावाच्या ठिकाणी येत असल्याने दुर्घटनांचे प्रमाण वाढल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी यंदा रायगड जिल्ह्यातील धबधबे, धरणे, पाणवठे आणि तलाव क्षेत्रात पर्यटकांना जाण्यास मनाई करणारा आदेश काढण्यात आला आहे.

कर्जत उप विभागात येणार्‍या रायगड जिल्ह्यातील २३ ठिकाणी हे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. ९ जून ते ८ ऑगस्ट २०२१ पर्यंत हा आदेश लागू राहील. या आदेशान्वये सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पाण्याच्या प्रवाहात उतरण्यास मनाई करण्यात आली आहे. कर्जत तालुक्यातील आषाणे-कोषाणे धबधबा, सोलनपाडा धरण, पळसदरी धरण, कोंढाणे धरण आणि धबधबा, पाली भुतिवली धरण, नेरळ जुमापट्टी धबधबा, बेडीसगाव धबधबा, पाषाणे तलाव, बेकरे धबधबा, आनंदवाडी धबधबा, टपालवाडी धबधब्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. खालापूर तालुक्यातील झेनिथ धबधबा, आडोशी धबधबा आणि परिसर, आडोशी तलाव, बोरगाव धबधबा, भिलवले धरण, मोरबे डॅम, नढाळ-वरोसे धरण, वावर्ले धरण, माडप धबधबा, धामणी धबधबा, कलोते आणि सर्व पाणवठे आणि धरणावर जाण्यास बंदी आहे.

पावसामुळे निर्माण झालेल्या धबधब्यांच्या परिसरात मद्यपान करण्यास आणि विक्री करणे आणि मद्यधुंद अवस्थेत असणे, सेल्फी अगर चित्रीकरण करणे, धोकादायक ठिकाणी वाहन थांबविणे, वाहन वेगाने चालविणे, वाहतुकीस अडथळा आणणे किंवा धोकादायक स्थितीत वाहने चालविणे आणि त्यांना ओव्हरटेक करणे, सार्वजनिक ठिकाणी केरकचरा करणे, महिलांची छेडछाड करणे, टिंगलटवाळी करणे, असभ्य वर्तन आणि अश्लील हावभाव करणे, लज्जा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य, सार्वजनिक ठिकाणी डीजे किंवा मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, जल, वायू, ध्वनी प्रदूषण करणे, कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने सोशल डिस्टन्सिंग पालन करणे आवश्यक आहे .

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top