वसई : रिक्षाचालकाला जंगलात नेऊन मारहाण करत त्याची रिक्षा आणि रोख रक्कम लुटणाऱ्या तिघा आरोपींना विरार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेली रिक्षा जप्त करण्यात आली असून या कारवाईमुळे गंभीर स्वरूपाचा जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
27 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास विरार पूर्व परिसरात ही घटना घडली होती. फिर्यादी हे रिक्षाचालक असून त्यांच्याकडे चार युवकांनी बरफपाडा ते विरार फाटा येथे तातडीने जायचे असल्याचे सांगून रिक्षा भाड्याने घेतली होती. काही अंतर गेल्यानंतर कांदळपाडा परिसरात एका युवकाने बाथरूमला जायचे असल्याचा बहाणा करून रिक्षा थांबवण्यास सांगितले. रिक्षा थांबताच बाहेर उतरलेल्या युवकांनी रिक्षाचालकाला जबरदस्तीने बाहेर खेचले. त्यानंतर त्याला जवळील जंगलात नेऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच शिवीगाळ करत त्याच्या खिशातील 1 हजार 700 रुपयांची रोख रक्कम आणि रिक्षा घेऊन पसार झाले. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन विरार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ तपास सुरू केला. फिर्यादीने दिलेले वर्णन, तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी तीन आरोपींची ओळख पटवून त्यांना चंदनसार परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून लुटलेली बजाज कंपनीची ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या रिक्षेची किंमत सुमारे 60 हजार रुपये असून त्यामुळे गुन्हा पूर्णपणे उघडकीस आला आहे.
पोलिसांनी या प्रकरणात अमन ठाकुर (25), प्रतिक सिंग (20) आणि मानव किणी (22) या तिघांना अटक केली असून चौथ्या आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विरार पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण झाला आहे.

