नवी दिल्ली : आयपीएल 2026 स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून येत्या रविवारी (31 मे) अंतिम सामना खेळवला जाणार आहे. मात्र स्पर्धा संपण्याच्या आधीच लखनऊ संघाचा कर्णधार ऋषभ पंत याने अत्यंत निराशाजनक कामगिरीनंतर संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.
फ्रँचायझीने आज (29 मे) जारी केलेल्या एका अधिकृत निवेदनात या घडामोडीला दुजोरा दिला आहे. संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले की, ऋषभ पंतने स्वतःच आपल्याला कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती आणि ही विनंती तत्काळ प्रभावाने स्वीकारण्यात आली आहे. यासंदर्भात फ्रँचायझीचे क्रिकेट संचालक टॉम मूडी यांनी माहिती दिली आहे.
आपल्या निवेदनात टॉम मूडी म्हणाले की, ऋषभ पंतने फ्रँचायझीकडे कर्णधारपदावरून पायउतार होण्याची विनंती केली आणि आम्ही त्याची ही विनंती आदराने स्वीकारली आहे. कारण असे निर्णय घेणे कधीच सोपे नसते. कर्णधार म्हणून आपल्या कार्यकाळात ऋषभने ड्रेसिंग रूममध्ये दिलेल्या योगदानाबद्दल आम्ही त्याचे आभारी आहोत. आमचे संपूर्ण लक्ष आता संघाची पुनर्बांधणी करण्यावर आणि आमची कामगिरी सुधारण्यावर केंद्रित आहे, असे टॉम मूडी यांनी सांगितले." दरम्यान, फ्रँचायझीने अद्याप नवीन कर्णधाराच्या नावाची अधिकृत घोषणा केलेली नाही. येत्या काही दिवसांत संघ व्यवस्थापन नवीन नेतृत्वाबाबत निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे.
सलग दोन हंगामात प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात लखनऊला अपयश
आयपीेल 2025 च्या लिलावादरम्यान लखनऊ सुपर जायंट्सने ऋषभ पंतला तब्बल 27 कोटी रुपयांच्या विक्रमी किमतीला संघात सामील करून घेतले होते. फ्रँचायझीला त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या, परंतु कर्णधार म्हणून त्याचा कार्यकाळ त्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरला. आयपीएल 2025 च्या आयपीएल हंगामात संघाला 14 पैकी केवळ 6 सामन्यांमध्ये विजय मिळवता आला होता, तर आयपीएल 2026 मध्ये लखनऊ संघाची कामगिरी त्यापेक्षाही अत्यंत खराब राहिली. संघाला 14 पैकी केवळ 4 सामन्यांत विजय मिळवता आला आणि गुणतालिकेत त्यांना अगदी तळाच्या स्थानावर समाधान मानावे लागले. अशा प्रकारे पंतच्या नेतृत्वाखाली लखनऊ संघाने दोन्ही हंगामात खेळलेल्या 28 सामन्यांमध्ये मिळून केवळ 10 विजयांची नोंद केली.
फलंदाजीतील पंतची निराशाजनक कामगिरी
दरम्यान, कर्णधारपदाच्या जबाबदारीसोबतच ऋषभ पंतच्या वैयक्तिक कामगिरीही निराशाजनक राहिली. 2025 च्या आयपीएलमध्ये पंतने 14 सामन्यांमध्ये 269 धावा केल्या होत्या, तर 2026 च्या आयपीएलमध्ये त्याने फलंदाजी करताना 312 धावांची नोंद केली. मात्र, त्याच्या डावांमध्ये सातत्याचा स्पष्ट अभाव दिसून आला.

