Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
समाजभान हरवलेले सेलिब्रिटी

समाजभान हरवलेले सेलिब्रिटी

- डॉ. संदीप तपासे

नलाईन गेमिंगच्या जाहिराती करणार्‍या सेलिब्रिटींचे वैयक्तिक आयुष्य किंवा आर्थिक गणित कधीही बिघडत नाही. त्यांच्या सात पिढ्या बसून खातील एवढी प्रचंड संपत्ती त्यांनी देशात आणि परदेशात गोळा करून ठेवली आहे.

हे अभिनेते स्वत: कधीही विमल खात नाहीत, की त्यांचे मुले ऑनलाईन रमीवर पैशांची पैज लावत नाहीत. ते फक्त मेकअप करतात, कॅमेर्‍यासमोर येतात, स्क्रिप्ट वाचतात, खोटे हास्य दाखवतात आणि कोट्यवधी रुपये खिशात घालून आपल्या आलिशान गाड्यांमधून निघून जातात. बर्बाद होतो तो फक्त भारताचा मध्यमवर्गीय कष्टकरी आणि गरीब तरुण!


दोन-चार दिवसांपूर्वी एका प्रतिष्ठित वर्तमानपत्रात एक बातमी वाचनात आली, 'जुगार खेळताना 47 जण रंगेहाथ पकडले.' या बातमीत पोलिसांनी त्या जुगार्‍यांकडून किती मुद्देमाल जप्त केला, कुठली वाहने पकडली याचे सविस्तर विश्लेषण तर होतेच, शिवाय त्या लोकांची नावे आणि गावेही ठळकपणे छापून आली होती. हे झाले आपल्या ग्रामीण किंवा निमशहरी भागातील रोजचे चित्र. पोलिसांनी केलेली कारवाई, समाजात झालेली नाचक्की आणि कायद्याचा बडगा! पण याच नाण्याच्या दुसर्‍या बाजूचा आपण कधी गंभीरपणे विचार केला आहे का?ऑनलाईन जुगाराचे काय? ज्या ऑनलाईन सट्टेबाजीची, रमीची आणि काल्पनिक क्रीडा स्पर्धांची (Fantasy Sports) जाहिरात आपले लाडके सेलिब्रिटी, करोडो रुपयांचे मानधन घेऊन, कोट्यवधी चाहत्यांच्या गळ्यात उतरवत आहेत, त्यांच्यावर कोण आणि कधी कारवाई करणार? हा आजच्या घडीचा सर्वात मोठा, तितकाच अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. देशातील तरुण पिढीला प्रगतीच्या मार्गावर नेण्याऐवजी हे सेलिब्रिटी त्यांना व्यसनाच्या आणि कर्जाच्या दरीत ढकलत आहेत.वाढत्या ऑनलाईन जुगाराच्या व्यसनामुळे आणि नैराश्यातून होणार्‍या तरुणांच्या आत्महत्यांमुळे केंद्र सरकारकडून नवीन मार्गदर्शक सूचना आणि नियम जारी करण्यात आले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सट्टेबाजी, ऑनलाईन गेमिंग आणि जुगाराच्या जाहिरातींविरुद्ध कडक पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. तसेच प्रसारमाध्यमांना, मग ते वृत्तपत्र असो, टीव्ही वाहिन्या असोत की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अशा सरोगेट जाहिराती प्रसारित न करण्याचा कडक सल्ला दिला आहे. या नव्या नियमांनुसार कोणत्याही प्रकारच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सट्टेबाजीला मनाई करण्यात आली असून, त्यावर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र आणि स्वायत्त यंत्रणा तयार केली आहे. तसेच ऑनलाईन गेमिंग कंपन्यांसाठी KYC (Know Your Customer) पडताळणी अनिवार्य केली आहे, जेणेकरून अल्पवयीन मुले या जाळ्यात अडकणार नाहीत. परंतु, हे नियम कागदावर जितके कडक दिसतात, तितकेच ते प्रत्यक्ष टीव्हीच्या पडद्यावर मलीन होताना दिसतात. आयपीएल असो वा कोणतीही मोठी क्रिकेट मालिका, ओळीने लागणार्‍या जाहिरातींमध्ये हेच सेलिब्रिटी कायदेशीर पळवाटा शोधून तरुणांना पैशांचे आमिष दाखवताना दिसतात.काही महिन्यांपूर्वी बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन तरुण अभिनेता रणवीर सिंगसोबत 'कमला पसंद' सारख्या गुटखासदृश पदार्थांची जाहिरात करताना दिसतात, तर दुसरीकडे स्वत:ला 'फिटनेस आयकॉन' म्हणवणारे पूर्वी अक्षय कुमार, 'सिंघम' अजय देवगण आणि किंग खान शाहरुख खान सध्या टायगर श्रॉप 'विमल पान मसाला'च्या जाहिरातीत 'बोलो जुबां केसरी' म्हणत एकत्र थिरकताना दिसतात. एका बाजूला कर्करोगाविरुद्ध लढण्याचे आवाहन करायचे आणि दुसर्‍या बाजूला कर्करोगाला निमंत्रण देणार्‍या पदार्थांची जाहिरात करायची, हा ढोंगीपणा नाही तर काय?अक्षय कुमारचे काही जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तो मी कधीही तंबाखू किंवा गुटख्याची जाहिरात करणार नाही, कारण ती माझ्या तत्त्वांच्या विरोधात आहे. मला पैशांची हाव नाही, असे मोठ्या अभिमानाने सांगत होता. आज ती तत्त्वे कोट्यवधी रुपयांच्या पॅकेजसमोर कशी विरघळली, हे संपूर्ण देश उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. जनतेच्या तीव्र संतापानंतर त्याने माफीनामा सादर केला. आता त्या जाहिरातीतून माघार घेतली आहे.क्रिकेटपटू रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, सौरव गांगुली आणि अभिनेता आमिर खान, आर. माधवन, सलमान खान, हृतिक रोशन, टायगर श्रॉफ हे सर्वजण तरुणांना थेट आव्हान देतात, मी माझी टीम सांभाळतो, तुम्ही तुमची टीम बनवा! म्हणजेच, आम्ही आमचे कोट्यवधी रुपये कमावतो, तुम्ही मात्र तुमचा खिसा रिकामा करून जुगार खेळा! याच्या अगदी उलट, 'पुष्पा' फेम दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन आणि क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी करोडो रुपयांची पान मसाल्याची आणि सट्ट्याची जाहिरात केवळ सामाजिक जबाबदारी म्हणून नाकारली. याला म्हणतात खरे समाजभान!आजच्या घडीला जेव्हा आपण प्रशासकीय स्तरावर पाहतो, तेव्हा आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यासारख्या डॅशिंग, प्रामाणिक आणि शिस्तप्रिय अधिकार्‍यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि दिशादर्शक ठरते. तुकाराम मुंढे यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत सार्वजनिक आरोग्य, नैतिकता, कायदेपालनाचे महत्त्व आणि सामाजिक मूल्यांची जपणूक करण्यावर नेहमीच भर दिला आहे. त्यांच्या मते, कोणत्याही देशाची खरी प्रगती ही तिथल्या सिमेंटच्या जंगलांवर नाही, तर तिथल्या तरुणांच्या आरोग्यावर आणि मानसिकतेवर अवलंबून असते. जर तरुण पिढीला व्यसनाधीनतेच्या आणि जुगाराच्या आहारी ढकलले जात असेल, तर ते देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी सर्वात मोठे संकट आहे.गुटखा, पान मसाला आणि सरोगेट पद्धतीचा वापर करून ऑनलाईन जुगाराच्या जाहिराती करणार्‍या शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांसारख्या बड्या सेलिब्रिटींना केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून आणि न्यायालयाकडून 'कारणे दाखवा' नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सर्वसामान्यांवर तातडीने कारवाई करणारे पोलीस आणि प्रशासन या बड्या असामींवर कधी हात टाकणार, या जनतेच्या प्रश्नाला आता कुठे सुरुवात झाली आहे. या नोटिसा म्हणजे या समाजभान हरपलेल्या तार्‍यांना मिळालेली पहिली कायदेशीर चपराक आहे. जर हे अभिनेते देशाच्या कायद्यापेक्षा स्वत:ला मोठे समजत असतील, तर त्यांना आता न्यायालयाच्या पिंजर्‍यात उभे राहावेच लागेल.ग्रामीण भागात किंवा एखाद्या शहरात पारावर बसून टाईमपास म्हणून पत्ते खेळणार्‍या 4-5 गरीबांवर पोलीस धाड टाकतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात आणि त्यांना लॉकअपची हवा दाखवतात. वृत्तपत्रात त्यांची नावे छापून त्यांची नाचक्की केली जाते. पण दुसरीकडे, डिजिटल माध्यमांद्वारे थेट करोडो लोकांच्या खिशात आणि मोबाईल स्क्रीनवर जुगार पोहोचवणार्‍या या सेलिब्रिटींपर्यंत मात्र कायद्याचे हात पोहोचत नाहीत. उलट त्यांना व्हीआयपी सुरक्षा आणि रेड कार्पेट दिले जाते. हा दुटप्पीपणा का? खेड्यातील जुगाराने कदाचित एखाद्या कुटुंबाचे नुकसान होईल, पण या ऑनलाईन रमी आणि 'गेमिंग' अ‍ॅप्समुळे देशातील लाखो तरुण उद्ध्वस्त होत आहेत. नुकतीच एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली आहे की, बीड जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबातील तरुणाने या ऑनलाईन जुगाराच्या नादात तब्बल 40 लाख रुपये गमावले. हे कर्ज फेडण्यासाठी त्याला स्वत:चे शेत, हक्काची गाडी आणि राहते घर विकावे लागले. कर्जबाजारीपणा आणि मानसिक तणावामुळे आज कित्येक तरुणांचे संसार सुखाने फुलण्याआधीच कोमेजून जात आहेत. अशा अनेक घटना दररोज घडत आहेत, ज्या केवळ भीतीपोटी किंवा शरमेपोटी समाजमाध्यमांसमोर येत नाहीत.तरुणांनो, वेळीच सावध व्हा! शेवटी, एक कटू सत्य आपण सर्वांनी स्वीकारले पाहिजे, या जाहिराती करणार्‍या सेलिब्रिटींचे वैयक्तिक आयुष्य किंवा आर्थिक गणित कधीही बिघडत नाही. त्यांच्या सात पिढ्या बसून खातील एवढी प्रचंड संपत्ती त्यांनी देशात आणि परदेशात गोळा करून ठेवली आहे. हे अभिनेते स्वत: कधीही विमल खात नाहीत, की त्यांचे मुले ऑनलाईन रमीवर पैशांची पैज लावत नाहीत. ते फक्त मेकअप करतात, कॅमेर्‍यासमोर येतात, स्क्रिप्ट वाचतात, खोटे हास्य दाखवतात आणि कोट्यवधी रुपये खिशात घालून आपल्या आलिशान गाड्यांमधून निघून जातात. बर्बाद होतो तो फक्त भारताचा मध्यमवर्गीय कष्टकरी आणि गरीब तरुण! ज्या तरुण वयात देशाच्या विकासात योगदान द्यायचे, करिअर घडवायचे, त्या वयात आपल्या देशातील तरुण मोबाईल स्क्रीनवर पत्त्यांचे आणि सट्ट्याचे गणित मांडत बसला आहे, हे या देशाचे मोठे दुर्दैव आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar