मुंबई : पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरीत पहिल्या काही तासांतील कल समोर येत आहे. त्यानुसार पश्चिम बंगाल, आसाम, पुदुच्चेरीत भाजप आघाडीवर असल्याचं दिसत आहे. तर, तामिळनाडू अभिनेता विजय याचा 'टीव्हीके' या पक्षानं आघाडी घेतली असून सत्ताधारी 'डीमके'ला धक्का बसला आहे.
यावर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजप स्पर्धेत आहे. टक्कर देतोय. ममता बॅनर्जींना शह देण्यासाठी निवडणूक आयोग, भाजप, मोदी-शाह यांनी ९० लाख मते मतदार यादीतून काढली. केंद्र सरकार, आयोग किंवा केंद्रीय पोलीस दलाने निवडणुकीचा ताबा घेतला, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
संजय राऊत म्हणाले, "अद्याप भाजपला कौल दिला नाही. हे सुरूवातीचे कौल आहेत. मतमोजणीच्या २०-२२ फेऱ्या सुरू असतात. शेवटच्या दोन किंवा तीन फेऱ्यांत खरे निकाल लागतात. तामिळनाडुतील चित्र मी पाहिलं. तिथेही आपल्याला थांबावे लागेल. या क्षणी फक्त कल हाती येत आहेत. पहिल्या किंवा दुसऱ्या फेरीत निकाल सांगू शकत नाहीत."
"पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना निवडणुकीत तळ ठोकून बसणे, एवढेच काम आहे. देशात किंवा महाराष्ट्रात मुलींवर अत्याचार होत आहे. भ्रष्टाचार सुरू आहे. महागाई वाढली आहे. नोकऱ्या नाहीत. त्यासाठी कुणीही तळ ठोकून काम करत नाही. एखाद्या राज्यात निवडणुका आल्यावर मोदी-शहांचे सरकार हे तळ ठोकूनच बसते. देशाच्या हिताचे आणि विकासाचे फार मोठे काम त्यांच्यादृष्टीक्षेपात आहे, असं दिसत नाही. निवडणूक हा भाजपचा मित्रपक्ष आहे," असा आरोप राऊतांनी केला आहे.
"पश्चिम बंगालमध्ये भाजप स्पर्धेत आहे. टक्कर देतोय. ममता बॅनर्जींना शह देण्यासाठी निवडणूक आयोग, भाजप, मोदी-शाह यांनी ९० लाख मते मतदार यादीतून काढली. केंद्र सरकार, आयोग किंवा केंद्रीय पोलीस दलाने निवडणुकीचा ताबा घेतला. तरीही कांटे की टक्कर होताना दिसत आहे. नाहीतर पश्चिम बंगालमध्ये भाजपचे फार मोठे स्थान आहे, असं वाटत नाही. जोपर्यंत पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसामचे पूर्ण निकाल २ किंवा ३ वाजता हाती येतील, तेव्हा मत व्यक्त केले पाहिजे. सुरूवातीचे कल पोस्टल मतदानाचे होते, हळू-हळू मतदान मोजण्यास सुरूवात झाली आहे," असं राऊतांनी सांगितलं.

