Dailyhunt
Sanjay Raut : मोदींनी जरा भान ठेवून बोललं पाहिजे, संजय राऊत कशामुळे पंतप्रधानांवर चिडले?

Sanjay Raut : मोदींनी जरा भान ठेवून बोललं पाहिजे, संजय राऊत कशामुळे पंतप्रधानांवर चिडले?

मुंबई : इंदिरा गांधी देशातील सर्वोच्च आणि नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही लोकप्रिय नेत्या होत्या. पण, नंतर लोकांनी इंदिरा गांधींचा पराभव केला. जिथे इंदिरा गांधी होत्या, त्या सर्वोच्च टोकावर मोदी आहेत.

पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूत विरोधी पक्षाचा झालेला पराभव हा मोदींच्या पतनाची सुरूवात आहे. दिवा विझताना त्याची वात मोठी होते आणि विझते. दिव्याची वात मोठी झालेली आहे, हळूहळू दिवा विझताना दिसेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

संजय राऊत म्हणाले, "भाजप खासकरून पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ हे ३६५ दिवस निवडणुकीची प्रॅक्टिस करत असतात. या देशात विकासाचे, रोजगाराचे, सुरक्षिततेचे, महिलांचे सुरक्षेचे प्रश्न आहेत. हे त्यांच्या खिजगणतीत नाही. ३६५ दिवस रोज निवडणुका कशा लढायच्या आणि कशा जिंकता येतील, यावर त्यांचं काम चाललेलं असतं."

"गृहमंत्री शाह हे २० दिवस पश्चिम बंगालमध्ये राहतात. सत्ता आणि पैशांचा वापर केला जातो. त्यामुळे निवडणुकीत कोण जिंकलं आणि कोण हारलं, याची चर्चाच होऊ शकत नाही. लोकशाही देशात राहिली नसली तरी लोकशाहीच्या नावानं हे निकाल स्वीकारत पुन्हा उभा राहायचे असते. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडुतील पराभव हा लोकाशाहीसाठी धोक्याची घंटा आहे," असे मत राऊतांनी व्यक्त केले.

३३३ मते मिळवणारे बिचुकले म्हणतात, सुनेत्रा पवारांच्या विजयात माझा वाटा, आता देवाभाऊ…

"देशात कुठल्याही राज्यात विरोधी पक्षाचे अस्तित्व ठेवायचे नाही, अशी भूमिका घेऊन सत्ताधारी काम करत असतील, तर निवडणुका लढायला नकोच. लाखो मतदारांची संख्या कमी करून विजय मिळवला जातो. यात निवडणूक आयोग सहभागी असतो. यातून विजय मिळाल्यावर विजयोत्सव साजरा करणारे लोकशाहीच्या छातीवर नाचतात. अशाप्रकारच्या निवडणुका पाकिस्तान, रशिया आणि अन्य देशात होतात. भारतातही त्याच पद्धतीने निवडणुका आणि लोकशाही जाताना दिसत आहे," अशी काळजी राऊतांनी व्यक्त केली.

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या पक्षांना महिलांनी धडा शिकवला, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. याबद्दल विचारल्यावर राऊत म्हणाले, "मग केरळमध्ये महिलांनी का धडा शिकवला नाही. तामिळनाडूत भाजप आणि एआयडीएमके जिंकायला हवी होती. तिथे टीव्हीके नावाचा नवीन पक्ष जिंकला आहे. त्या पक्षाची महिला आरक्षणासंदर्भात काहीही भूमिका नव्हती. देशाच्या पंतप्रधान मोदींनी जरा भान ठेवून बोललं पाहिजे. कोणतेही भान ठेवता बोलल्यावर तुमच्या अशा प्रकारच्या विजयांना नैतिक अधिष्ठान मिळणार नाही. तामिळनाडूत सर्वाधिक महिला आहेत. मग, तिकडे तुम्हाला अपयश कशामुळे मिळालं?"

इंडिया आघाडीचं भवितव्य काय आहे? या प्रश्नावर राऊतांनी म्हटलं, "इंडिया आघाडीचं भविष्य अतिशय उत्तम आहे. इंदिरा गांधींचा पराभव होण्याआधी त्यांनी देशातील सगळी राज्ये जिंकली होती. इंदिरा गांधी सर्वोच्च आणि मोदींपेक्षाही लोकप्रिय नेत्या होत्या. पण, नंतर लोकांनी त्यांचा पराभव केला. जिथे इंदिरा गांधी होत्या, त्या सर्वोच्च टोकावर मोदी आहेत. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूत झालेला विरोधी पक्षाचा पराभव हा मोदींच्या पतनाची सुरूवात आहे. दिवा विझताना त्याची वात मोठी होते आणि विझते. दिव्याची वात मोठी झालेली आहे, हळूहळू दिवा विझताना दिसेल. भाजप हिंदुत्त्ववादी पक्ष आहे म्हणून हे शास्त्र सांगतोय."

खरा धर्म बुडताना दिसतोय, भाजपच्या विजयावर ठाकरे गटाची टीका

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar