जो पुष्कळांना मनापासून आवडतो तो मनुष्य चांगला; असा मनुष्य अजरामर होतो. तो निःस्वार्थीपणाने राहून मनावर संयम ठेवतो, स्वतःच्या स्वार्थासाठी दुसर्याला बुडविण्याचा दुष्टपणा त्याच्याकडून होणेच शक्य नाही, असा सत्पुरुष म्हातार्याला म्हातारा, पुरुषाला पुरुष, मुलाला मुलासारखा दिसतो; म्हणजेच जो ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे त्याचे त्याच्याशी वर्तन असते.
अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी. माझे चुकते कुठे हे वे. दुःख भोगण्याची मला पाळी आली, म्हणजे मार्ग चुकला म्हणावे, ज्याला सुख-दुःख बाधत नाही तोच खरा समाधानी. 'मी रोज नामस्मरण करतो, चार वर्षे माझे भजन नाही चुकले, असे आपण म्हणतो; पण 'मी हे सर्व करतो' अशी सारखी आठवण ठेवली तर काय उपयोग? मी मेहनत घेतो पण थोडक्यात नासते, ते या अभिमानामुळे. जोपर्यंत अभिमान सोडून भगवंताचे स्मरण मी करीत नाही तोपर्यंत ते 'स्मरण' कसे म्हणावे? भगवंताशिवाय इतर जाणीव ठेवून, मी त्याच्याशी अनन्यपणे वागतो असे कसे म्हणता येईल? गोंदवलेकर महाराज म्हणतात की, तुम्हाला खरेच सांगतो, तुम्ही रामाकडे कर्तेपण द्या आणि त्याच्या इच्छेने वागा, तुमची देहबुद्धी नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. खुणेने जावे, संतांनी सांगितलेल्या मार्गाने जावे, म्हणजे मार्ग सापडतो. खरी तळमळ लागली म्हणजे मार्ग दिसतो आणि खरी कळकळ असली म्हणजे त्यात प्रेम निर्माण होते. 'भगवंताने माझी आपत्ती दूर करावी, हे म्हणणे वेडेपणाचे आहे. संकटे, आपत्ती आल्या म्हणून भगवंताला विसरणे हे केव्हाही योग्य नाही. देहबुद्धीचा नाश नामाच्या स्मरणात आहे खास! नामात प्रेम येत नाही याचा विचार करीत राहिलो तर नामाचाच विसर पडतो, हे कुठे ध्यानात येते! उगीच विचार करीत बसू नये. समुद्र ओलांडून जाण्याकरिता रामाचे नाव घेऊन जी वीट ठेवली ती राहिली, हे लक्षात ठेवा.

