Friday, 27 Nov, 4.09 pm My महानगर

महामुंबई
सरकारनं वर्षभरात महाराष्ट्राला परावलंबी केलं - आशिष शेलार

राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला येत्या २८ नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत असताना राज्य सरकारनं वर्षभरात काय केलं? किती यश मिळालं, किती अपयश आलं? यावर चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधक असलेल्या भाजपकडून राज्य सरकारवर, शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसवर आणि विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला जात आहे. त्यात आता भाजप नेते आणि आमदार Adv आशिष शेलार यांनी ट्वीट करून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. 'गेल्या वर्षभरात सरकारनं राज्याला परावलंबी केलं', अशी टीका त्यांनी ट्वीटरवर केली आहे.

काय म्हणाले आशिष शेलार?

आशिष शेलार यांनी हे वर्ष परावलंबी असल्याचं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 'परावलंबी वर्ष! तिघाडीच्या परावलंबी सरकारने महाराष्ट्राला वर्षभरात परावलंबी केलं. कोणतीही कणखल भूमिका नाही. ठोस निर्णय नाही. शेतकरी, कामगार, श्रमिक, बलुतेदार, छोटे उद्योग यांना कसलीही मदत केली नाही. खंबीर आधार नाही. दुसऱ्याकडे बोट दाखवून रडगाणे गाणारे नेतृत्व दिसले. शाळा, परीक्षा, प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम, आरक्षण या सगळ्या बाबतीत संभ्रम. कापूस, धान खरेदी झाली नाही. शेतकऱ्यांना मदत मिळणार की नाही याची हमी नाही. जिथे गणपतीची उंची, लोकल ट्रेनचा निर्णय सुद्ध होऊ शकत नाही. तिथे वर्षपूर्तीचं कसलं अभिनंदन आणि कसल्या मुलाखती!' असं आशिष शेलार ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

कंगणावरून देखील साधला निशाणा!

दरम्यान, दुसऱ्या ट्वीटमध्ये आशिष शेलार यांनी कंगणा मुद्द्यावरून देखील निशाणा साधला आहे. 'कु-हेतू, वैयक्तिक सूडबुद्धीचं राजकारण महाराष्ट्राच गेल्या वर्षभरात सुरू आहे. यावर आता मुंबई उच्च न्यायालयाने जणू शिक्कामोर्तबच केलं. ठाकरे सरकारने वैयक्तिक सूडाने पेटून मुंबई महापालिकेला तोंडघशी पाडलं. आता कंगणा रनौत यांना नुकसान भरपाई द्यावी लागली तर? कंगणा यांच्या विरोधात उभ्या केलेल्या वकिलांवर खर्च झालेले पालिकेचे १ कोटी आणि कंगणा यांनी दावा केलेले २ कोटी अशी जी काही रक्कम व्हॅल्युअर ठरवतील ती कोट्यवधींची रक्कम मुंबईकरांच्या खिशातून नको, तर आदेश देणाऱ्यांनी स्वत:च्या तिजोरीतून भरावी!', असं शेलार म्हणाले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top