दिल्ली : महायुतीत एकनाथ शिंदे हे गुदमरलेले दिसत आहेत. मुख्यमंत्री सांगतात शिंदे आमचे मित्र, सहकारी आहेत. जे मुख्यमंत्र्यांना ओळखतात, त्यांना फडणवीसांचे संकेत कळतात. भविष्यात घटनांची ही नांदी आहे.
भविष्यात भाजप आणि शिंदे एकत्र निवडणूक लढू शकत नाहीत, असा दावा शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी केला होता. राऊतांच्या विधानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिकचे बोलणं टाळलं आहे.
संजय राऊतांनी केलेल्या दाव्याबद्दल एकनाथ शिंदेंना दिल्लीत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा एकनाथ शिंदेंनी मोजक्या वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे बुधवारी दिल्ली दौऱ्यावर गेले होते. अजूनही दिल्लीत असलेल्या एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
संजय राऊतांच्या विधानावर विचारल्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, "यावर मला काहीही भाष्य करायचे नाही. महायुती मजूबत आहे. आम्ही एकत्र काम करतोय. महाराष्ट्राचा विकास वेगानं सुरू आहे. याची पोटदुखी विरोधकांना आहे. हे विरोधकांच्या पचनी पडत नाही. त्यामुळे दिशाभूल करणारी वक्तव्ये केली जात आहेत."
सावरकर हे हिंदू धर्मभिमानी, त्यांची प्रतिमा वापरून फक्त…; राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना झोडपलं
'महाराष्ट्रात एक आमची शिवसेना, दुसरी शरद पवारांची राष्ट्रवादी हे दोनच प्रादेशिक पक्ष आहेत,' असेही राऊत बोलले होते. याबद्दल विचारल्यावर एकनाथ शिंदेंनी म्हटलं, "आमचा कुठला पक्ष आहे? महाराष्ट्रात भाजप एक नंबर आणि शिवसेना दुसऱ्या नंबरचा पक्ष आहे. त्यांचा पक्ष कुठल्या नंबरला गेलाय, हे त्यांनाही माहिती नाही."
"महाविकास आघाडी १७ पैकी एकही जागा जिंकेल, असे वाटत नाही. महायुती १७ जागा लढवणार आणि जिंकणार आहे. महायुतीचा फॉर्म्युला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला आहे. महायुतीत कुठलेही मतभेद नाहीत," असे शिंदेंनी स्पष्ट केले.
संजय राऊत काय म्हणाले होते?
"शिंदे गट नेस्तनाबूत करण्याचा चंग मुख्यमंत्री फडणवीसांनी बांधला आहे. यासाठी आम्ही मुख्यमंत्री फडणवीसांच्या पाठीशी उभे राहू. ही घाण आणि बेईमानीची कीड तसेच भ्रष्टाचारातून आलेले शिंदेंचे सरकार दूर होत असेल तर आम्ही त्याचे स्वागत करू. विधानपरिषद निवडणुकीत भाजपचा वरचष्मा दिसतोय. दुसरीकडे एकनाथ शिंदे हे गुदमरलेले दिसत आहेत. मुख्यमंत्री सांगतात शिंदे आमचे मित्र, सहकारी आहेत. जे मुख्यमंत्र्यांना ओळखतात, त्यांना फडणवीसांचे संकेत कळतात. भविष्यात घटनांची ही नांदी आहे. भविष्यात भाजप आणि शिंदे एकत्र निवडणूक लढू शकत नाहीत.बच्चू कडू, आनंद परांजपे, हितेंद्र ठाकूर ह्या मोठ्या शक्ती वाटत आहेत का? लोकांनी नेस्तनाबूत केलेल्या या शक्ती आहेत. हे प्रादेशिक पक्ष नाहीत. महाराष्ट्रात एक आमची शिवसेना, दुसरी शरद पवारांची राष्ट्रवादी हे दोनच प्रादेशिक पक्ष आहेत. हे पक्ष प्रादेशिक अस्मिता आणि भूमिकेवर बोलतात. सध्या चणे, फुटाणे गोळा करण्याचं काम सुरू आहे," असे राऊत बोलले होते.

