Monday, 20 Jan, 5.27 am My महानगर

महाराष्ट्र
शिर्डी आणि परिसरातील २५ गावांत कडकडीत बंद

साईबाबा जन्मभूमीवरून निर्माण झालेल्या वादामुळे शिर्डीसह परिसरातील २५ गावांत रविवारी, १९ जानेवारी रोेजी कडकडीत बंद पाळण्यात आला. या बेमुदत बंदमुळे शिर्डीत साईभक्तांची मोठी गर्दी ऊसळल्याने स्थानिकांसह येथे आलेल्या साईभक्तांची गैरसोय झाली. शहरातून सकाळी ग्रामस्थ आणि साईभक्तांनी रॅलीदेखील काढली होती.औरंगाबाद येथील एका सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख पाथरी करत तेथे १० कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिर्डी आणि पाथरीकरांमधील वादाला तोंड फुटले. गावाच्या विकासाला विरोध नसल्याचे सांगत जन्मस्थळाच्या उल्लेखाबद्दल शिर्डीकरांचा आक्षेप आहे.

तर, पाथरी हेच जन्मस्थळ असल्याचा पाथरीकरांचा दावा आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी मध्यरात्रीपासून शिर्डीत बेमुदत बंद सुरू झाला आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री ठाकरे यावर भूमिका स्पष्ट करत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.'जगाला सबका मालिक एक'चा संदेश देणार्‍या बाबांच्या जन्मस्थळावरून सुरू असलेल्या वादात राजकीय नेतेदेखील उतरले आहेत. माजी मंत्री, आमदार राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे, कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनीदेखील आपण शिर्डीकरांसोबत असल्याचे स्पष्ट केल्याने आता बाबांच्या जन्मस्थळावरून सुरू झालेल्या वादात काय राजकारण घडते हे लवकरच समजेल. शिर्डीकरांनी पुकारलेल्या बंदला रविवारी चांगला प्रतिसाद मिळाला. शिर्डीतील दुकाने आणि व्यवहार रविवारी बंद होते. द्वारकामाईसमोरुन सर्वधर्म सद्भावना रॅलीदेखील काढण्यात आली. रॅलीची सुरुवात 'शिर्डी माझे पंढरपूर.'या आरतीने करण्यात आली. साईचरित्रातील ओव्यांचे फलक रॅलीचे आकर्षण ठरले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top