Saturday, 14 Dec, 1.21 pm My महानगर

होम
शिवसेनेने नागरिकत्वाच्या बाजूने रहावे; आमची राजकीय तडजोड करण्याची तयारी - शेलार

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकास शिवसेनेने मदत केल्यास आणि महाराष्ट्रातही ते लागू केल्यास त्याबदल्यात राष्ट्रहिताच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी राजकीय तडजोड करण्यास तयार आहे, अशी ऑफर आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिली. नाशिकमध्ये भाजपाच्या वसंत स्मृती कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नागरिकत्वाच्या मुद्यावरुन काँग्रेस, राष्ट्रवादीने सत्तेतून सहभाग काढून घेतला तरी शिवसेनेचे सरकार वाचविण्यासाठी आम्ही पुढे येऊ, असेही ते यावेळी म्हणाले. नागरिकत्व दुरुस्ती विधायकला लोकसभा आणि राज्यसभेने मंजुरी दिली. मात्र शिवसेनेने लोकसभेत या विधायकाच्या समर्थनार्थ मतदान केले. तर राज्यसभेत मात्र विरोध दर्शविला.

शिवसेना मंजुरी देऊन का घुमजाव करत आहे?

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दबावामुळे शिवसेनेने घुमजाव केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. इतकेच नाही तर, हे विधेयक महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही अशी भूमिका काँग्रेसच्या काही मंत्र्यांनी घेतली आहे. त्यामुळे चिंतीत झालेल्या भाजपा पदाधिकार्‍यांनी शिवसेनेला आता नवी ऑफर दिली आहे.

काय म्हणाले आशिष शेलार?

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करण्यासाठी काँग्रेसने भारत बचाव आंदोलन छेडले आहे. वास्तविक हे भारत बचाव नाही तर बांग्लादेशी, पाकिस्तानी बचाव आंदोलन आहे. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेनेचे सरकार आहे. हे सरकार वाचविण्यासाठी शिवसेनेने देशहिताकडे दुर्लक्ष करू नये. शिवसेनेने कोणालाही न घाबरता आपला मूळ बाणा दाखवावा. काँग्रेसच्या तीन मंत्र्यांनी नागरिकत्व विधेयक महाराष्ट्रात लागू करु नये अशी भूमिका घेतली आहे. या भूमिकेचा आम्ही निषेध करतो. लोकसभा आणि राज्यसभा या सर्वोच्च सभागृहाने या विधेयकाला मंजुरी दिलेली असतानाही विरोध करण्याचा उर्मटपणा बरा नव्हे. या उर्मटपणास शिवसेनेने तरी खतपाणी घालू नये. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे 'स्थगिती सरकार' बनले आहे. या सरकारने नागरिकत्व विधेयकाला स्थगिती देऊ नये. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावाला बळी न पडता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात या कायद्याची अंमलबजावणी करावी. त्यावरून काही पेचप्रसंग निर्माण झाल्यास सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेशी तडजोड करण्यास आम्ही तयार आहोत असं देखील ते म्हणाले. 'सत्ता आणि सत्तेसाठी राजकारण हा भाजपाचा कधीच हेतू नव्हता. घुसखोरांना घालवलेच पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्यामुळेच आम्ही शिवसेनेशी तडजोडीला तयार आहोत' असेही आमदार आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top