Dailyhunt
Shivsena UBT : खरा धर्म बुडताना दिसतोय, भाजपच्या विजयावर ठाकरे गटाची टीका

Shivsena UBT : खरा धर्म बुडताना दिसतोय, भाजपच्या विजयावर ठाकरे गटाची टीका

मुंबई : भाजपने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसवर ऐतिहासिक विजय मिळवला. 'पाच राज्यांतील निवडणूक निकाल भाजपसाठी गेम चेंजर ठरले, पण हे निकाल सरळ मार्गाने आल्याचे दिसत नसल्याचे मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने व्यक्त केले आहे.

तसेच, "मुलींवरील बलात्कारांनी धरणी कापत असताना महाराष्ट्रामध्ये, पश्चिम बंगाल, आसामच्या निवडणुकीत विजय मिळाला म्हणून उत्सव साजरे होतात. हे लोकशाहीचे भेसूर रूप सध्या दिसत आहे. अशा विकृतीला कोणी धर्माचा विजय म्हणणार असतील तर धर्माच्या रक्षणासाठी यापुढे कोणीही अवतार पृथ्वीवर अवतरणार नाही. कारण खरा धर्म बुडताना दिसत आहे." अशी टीका शिवसेना उबाठाने सामना या मुखपत्राच्या अग्रलेखात म्हटले आहे.

मोदी- शहांनी जंगजंग पछाडले

"ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने याआधीच्या तीन निवडणुका सलग जिंकल्या. या काळात ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी मोदी-शहांनी जंग जंग पछाडले, पण ममता यांचा पराभव करणे त्यांना जमले नाही. पण, यावेळी मोदी-शहांना निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या रूपाने तिसरा भिडू मिळाला. त्यामुळे भाजपला आताच्या निवडणुकीत यश मिळाले. पश्चिम बंगालमध्ये भाजप जिंकला त्याचे श्रेय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना द्यावे लागेल. ज्ञानेश कुमार पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपच्या मित्रपक्षाप्रमाणे वावरले. तीन लाखांचे अर्धसैनिक बल बंगालात उतरवले. राज्य सरकारचे सर्व अधिकारी राज्याबाहेर पाठवले. निवडणूक निष्पक्ष व्हावी हा त्यांचा उदात्त हेतू होता, पण हाच उदात्त हेतू त्यांनी आसामात दाखवला नाही." असे म्हणत त्यांनी निवडणूक आयोगालाही टोला लगावला. "पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून 92 लाख मतदारांची नावे उडवली. हे बहुसंख्य ममता बॅनर्जी यांना मानणारे मतदार होते." असा दावाही त्यांनी यावेळी केला आहे.

हा जनतेचा नवे निवडणूक आयोगाचा कौल - शिवसेना उबाठा

"लोकशाहीमध्ये निवडणुका निष्पक्ष रीतीने झाल्या तर पराभवही दिलदारीने स्वीकारायचा असतो. जनतेचा कौल म्हणून पराभव मान्य करायचा असतो, पण सध्या ज्या पद्धतीने निकाल लावले जात आहेत त्यास जनतेचा कौल मानता येत नाही, तर निवडणूक आयोगाच्या सहकार्याने भाजपने लावलेले कौल म्हणावे लागतील. पश्चिम बंगालमध्ये ते उघडपणे दिसले. त्याआधी महाराष्ट्र आणि हरयाणात हाच पॅटर्न दिसला होता. भारतातील लोकशाहीचे हे अधःपतन आहे, निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह आहे. या सगळ्यांची तक्रार घेऊन सर्वोच्च न्यायालयात जायचे तर तिथे सगळ्यांच्याच तोंडात मोदी-शहांच्या पॅटर्नने बोळे कोंबले आहेत. त्यामुळे या व्यवस्थेवरचाही विश्वास उडावा अशी स्थिती रोज निर्माण होताना दिसते." असेदेखील यावेळी शिवसेना उबाठाने म्हंटले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar