मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर केली. अशामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिवंगत अजितदादांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली होती.
ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी चर्चा रंगली असताना काँग्रेसने या जागेसाठी उमेदवारी जाहीर केली. यावरून आता महाविकास आघाडीमध्येच मतभेद निर्माण झाल्याचे समोर आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, सामना या त्यांच्या मुखपत्रातूनही काँग्रेसचे कान टोचले आहेत.
पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, "सुनेत्रा पवार यांनी स्वतः उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. मला पाठिंबा द्या, अशा प्रकारची दोघांमध्ये चर्चा झाली. आम्ही महाविकास आघाडीत असून काँग्रेसने उमेदवार उभा केला. जसा फोन उद्धव ठाकरेंना केला, तसेच सुनेत्रा पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांनाही केला. तसेच, त्या शरद पवारांनाही भेटल्या. बारामती हा पवारांचा गड आहे. तिथे काय निकाल लागणार, हे सर्वांनाच माहिती आहे. पण, राजकारणात आणि अशा निवडणुकांमध्ये काही विषय हे सामोपचाराने घ्यायचे असतात." असे म्हणत त्यांनी काँग्रेसला टोला लगावला.
शिवसेना उबाठाची नाराजी जाहीर
शिवसेना उबाठाच्या मुखपत्र असलेल्या सामनामधूनही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका केली आहे. "भारताची एकता विविधतेत असून प्रादेशिक पक्ष हे त्या एकतेमधील आणि विविधतेमधील पैलू आहेत. केंद्रामध्ये सत्ता मिळवायची असेल तर राज्याराज्यांतील प्रादेशिक पक्षांशी फटकून वागता येणार नाही. त्यांच्याशी केलेल्या आघाड्या आणि युतीचा सन्मान राखला पाहिजे. मित्रपक्षांच्या भावनांचा विचार न करता एखाद्या विषयावर अंतर राखणे हा दृष्टिकोन संकुचित ठरेल. मोठे ध्येय साध्य करण्यातला तो अडथळा ठरेल." असे म्हणत टोला लगावला आहे.
"केंद्रात सत्ता मिळवायची इच्छा मनापासून असेल तर राज्यातील मजबूत आघाडी हाच एकमेव मार्ग आहे. समंजसपणा म्हणजे कमजोरी नाही. ती राजकीय प्रगल्भताच ठरते. काँग्रेसने ही प्रगल्भता दाखवली तरच महाराष्ट्रासह देशभरातील प्रादेशिक पक्ष त्यांच्याकडे विश्वासाने पाहतील. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत म्हणून प्रादेशिक पक्षांचा सन्मान करतो आणि एकत्र येऊन देशाच्या भवितव्याचा विचार करतो हा संदेश काँगेसने द्यावा. एखाद्या विधान परिषद, राज्यसभेसाठी कुढत बसण्यात काय अर्थ?" असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे.
"महाराष्ट्र काँग्रेसचे प्रांतिक अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना त्यांचा पक्ष शिखरावर न्यायचा आहे व त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला हवे. राहुल गांधी यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व अशा पल्लेदार नेत्याकडे दिल्याने काँग्रेसचे शिखरावर पोहोचण्याचे स्वप्न साकार होईल अशा शुभेच्छा त्यांना द्यायला हव्यात, पण विधान परिषद किंवा राज्यसभेची एखादी जागा महाविकास आघाडीत पदरात पडल्यावरच आपला पक्ष शिखरावर जाईल ही त्यांची भूमिका असेल तर शिखराची उंची पुन्हा मोजावी लागेल." असे म्हणत प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांना टोला लगावला.

