रुचकर, खमंग आणि झणझणीत मराठमोळ्या पदार्थांनी भरलेली थाळी परदेशात सादर करून एक मराठी मुलगी सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये राहूनही आपल्या खाद्यसंस्कृतीची चव जगभर पोहोचवणारी ही कन्टेंट क्रिएटर म्हणजे श्वेता साकोडे.
नागपूरची श्वेता साकोडे लग्नानंतर 2013 मध्ये ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली. व्यवसायानं ती दंतवैद्य (डेंटिस्ट) आहे आणि सध्या क्लिनिकल रिसर्चच्या क्षेत्रात काम करते. विविध आजारांवर औषधं तयार करण्याच्या प्रक्रियेत तिचा सहभाग असतो. हे सगळं सांभाळत तिनं 2020 पासून सोशल मीडियावर मराठी पदार्थांच्या रेसिपी शेअर करायला सुरुवात केली. (marathi woman shweta sakode from melbourne appeared in the masterchef australia competition)
हळूहळू तिच्या व्हिडिओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. सर्व सणांसाठी खास पदार्थ बनवणं आणि ऑर्डर घेणं हे तिचं खास वैशिष्ट्य बनलं. या प्रवासात तिच्या पती आणि दोन मुलांनी तिला मोठा आधार दिला. आपल्या आवडीला आणखी मोठं व्यासपीठ मिळावं म्हणून श्वेतानं 'मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया' या प्रसिद्ध रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला. या स्पर्धेबद्दल बोलताना ती सांगते की, हा अनुभव ऑलिम्पिकसारखा होता. ऑडिशननंतर तिला तीन महिने कुटुंबापासून दूर राहून प्रशिक्षण घ्यावं लागलं. त्या काळात तिनं अनेक आंतरराष्ट्रीय पाककला तंत्र शिकली.
स्पर्धेदरम्यान श्वेतानं परीक्षकांना खास महाराष्ट्रीयन पदार्थांची चव चाखवली. आपल्या खाद्यसंस्कृतीचा प्रसार जगभर करायचा हा तिचा उद्देश आहे. सध्या ती या स्पर्धेतील अंतिम 40 स्पर्धकांपर्यंत पोहोचली आहे. कार्यक्रमाच्या अनुभवाविषयी ती सांगते, 'ही स्पर्धा म्हणजे ऑलिम्पिक असते. ऑडिशन आणि मुलाखतीच्या फेऱ्या झाल्यानंतर तीन महिने मला माझ्या कुटुंबापासून दूर एका अॅकॅडमीमध्ये राहावं लागलं. त्या दरम्यान आम्हाला सतत प्रशिक्षण दिलं जायचं. त्या तीन महिन्यांत मी आंतरराष्ट्रीय प्रक्रिया आणि पद्धती शिकून घेतल्या. तो काळ खूप काही शिकण्याचा आणि माझ्या आवडीला नवे आयाम देण्याचा होता. स्पर्धेदरम्यान मी परीक्षकांना महाराष्ट्रीय पदार्थांची चव चाखवली. आपली खाद्यसंस्कृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा मानस आहे. त्यासाठीच मी कायम प्रयत्नशील आहे.' या कार्यक्रमात श्वेता अंतिम 40 स्पर्धकांपर्यंत पोहोचली आहे. पाककलेला पुढच्या स्तरावर घेऊन जाण्यासाठी तिनं आवश्यक असलेली यंत्रं मागवली असून आता ती कोणकोणत्या रुचकर पदार्थांची चव चाखवते याकडे नेटकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

