Dailyhunt
Skincare Mistakes: तुम्हीही चेहऱ्यावर बॉडी लोशन लावता? सावधान!

Skincare Mistakes: तुम्हीही चेहऱ्यावर बॉडी लोशन लावता? सावधान!

प्रत्येकालाच आपण सुंदर दिसावं असं वाटत असतं आणि त्यासाठी अनेक प्रकारही सुरु असतात. तसंच त्वचा मऊ आणि चमकदार ठेवण्यासाठी लोशन वापरणं ही सर्वसामान्य सवय आहे. मात्र, अनेकजण सोयीसाठी किंवा अज्ञानामुळे बॉडी लोशनच चेहऱ्यावर लावतात, आणि इथेच मोठी चूक होते.

कारण चेहऱ्याची त्वचा आणि शरीराची त्वचा या दोन्हींची रचना वेगळी असते. त्यामुळे शरीरासाठी बनवलेलं लोशन चेहऱ्यावर वापरणं त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतं.

बॉडी लोशन आणि फेशियल लोशनमध्ये मूलभूत फरक असतो. बॉडी लोशन हे जाडसर (heavy) टेक्स्चरचं असतं आणि त्यात सुगंध, प्रिझर्व्हेटिव्ह्स आणि रसायनांचं प्रमाण जास्त असतं. तर चेहऱ्यासाठी तयार केलेले लोशन हलके (lightweight) आणि कमी रसायनयुक्त असतात. त्यामुळे बॉडी लोशन चेहऱ्यावर लावल्यास त्वचेची रंध्रे (Hole) बंद होण्याचा धोका वाढतो.

चेहऱ्यावर बॉडी लोशन लावण्याचे परिणाम
चेहऱ्यावर बॉडी लोशन वापरण्याचे अनेक दुष्परिणाम दिसू शकतात. सर्वात सामान्य समस्या म्हणजे मुरुमे आणि ब्लॅकहेड्स. लोशनमुळे रंध्रे ब्लॉक झाल्यास त्वचेवर तेल साचतं आणि त्यामुळे पिंपल्स वाढतात. याशिवाय, त्वचेचा नैसर्गिक समतोल बिघडून कोरडेपणा किंवा उलट जास्त तेलकटपणा जाणवू शकतो. काही वेळा बॉडी लोशनमधील सुगंध किंवा केमिकल्समुळे त्वचेवर ॲलर्जी, लालसरपणा किंवा खाज येऊ शकते. संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींमध्ये ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते. तसेच, दीर्घकाळ वापर केल्यास त्वचेचा रंग बदलणे किंवा निस्तेजपणा वाढण्याची शक्यता असते.

याशिवाय, जड लोशनमुळे त्वचा नीट श्वास घेऊ शकत नाही. त्यामुळे त्वचेचं नैसर्गिक पुनरुत्पादन (skin renewal) कमी होतं आणि कालांतराने सुरकुत्या आणि वयस्कर दिसणं यासारख्या समस्या वाढू शकतात. म्हणूनच, चेहऱ्यासाठी नेहमी फेशियल लोशन किंवा मॉइश्चरायझरचाच वापर करावा. आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार (कोरडी, तेलकट, मिश्र) योग्य प्रॉडक्ट निवडणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हलके, नॉन-कॉमेडोजेनिक आणि कमी रसायनयुक्त लोशन चेहऱ्यासाठी अधिक सुरक्षित मानले जाते.

सुंदर आणि निरोगी त्वचेसाठी योग्य प्रॉडक्टची निवड अत्यावश्यक आहे. सोयीसाठी केलेली छोटी चूकही त्वचेवर मोठा परिणाम करू शकते. त्यामुळे बॉडी लोशन चेहऱ्यावर वापरणं टाळा आणि योग्य स्किनकेअर रूटीन फॉलो करा.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar