Friday, 26 Feb, 3.12 am My महानगर

महाराष्ट्र
सोशल मीडिया कंपन्यांसाठी केंद्र सरकारची नियमावली

सोशल मीडियाचा होणारा वापर आणि गैरवापर या मुद्यांवर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे. ट्विटर, फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप अशा अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आक्षेपार्ह मजकूर व्हायरल केला जात असल्याच्या देखील अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. अशी अनेक प्रकरणे न्यायालयापर्यंत देखील गेली आहेत. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने यासंदर्भातली नवीन नियमावली जारी केली आहे. देशात सेवा देणारे फेसबुक, ट्विटरसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स यांनाही नियमावली बंधनकारक केली जाणार आहे. यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी ही घोषणा केली आहे.

सोशल मीडियाला भारतात व्यवसाय करण्याची पूर्ण मुभा आहे. त्यांचे स्वागत आहे. सोशल मीडियाच्या युजर्सच्या तक्रारी निवारण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे. आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. आक्षेपार्ह फोटो टाकले जात आहेत. देशाच्या नागरी व्यवस्थेला धक्का लावणार्‍या बाबी घडत आहेत. सोशल मीडियाचा वापर दहशतवादी, देशविघातक शक्तींकडून केला जातो. मोठ्या प्रमाणावर फेक न्यूज देखील चालवल्या जातात. आर्थिक घोटाळे केले जात आहेत, असे रवीशंकर प्रसाद यावेळी म्हणाले.

सोशल मीडिया कंपन्यांसाठी नियमावली
१) तक्रार निवारण व्यासपीठ आणि अधिकार्‍याची नेमणूक करावी लागेल. तो अधिकारी २४ तासांत तक्रार नोंद करून घेईल आणि १५ दिवसांत तिचे निवारण करेल.
२) जर युजर्सच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचवणारा मजकूर असेल, विशेषत: महिलांच्या, उदा. आक्षेपार्ह छायाचित्रे, असा मजकूर तक्रार दाखल झाल्यापासून २४ तासांत तो काढून टाकावा लागेल.
३) भारतात चीफ कम्प्लायन्स ऑफिसर, नोडल कॉन्टॅक्ट पर्सन आणि रेसिडेंट ग्रीव्हन्स ऑफिसरची नियुक्ती करावी लागेल.
४) प्रत्येक महिन्याला तक्रारींचा अहवाल सादर करावा लागेल. महिन्याभरात किती तक्रारी आल्या आणि त्याच्यावर काय कारवाई केली.
५) आक्षेपार्ह मजकूर सर्वात आधी कुणी सोशल मीडियावर टाकला ते सांगावे लागेल. जर तो मजकूर भारताबाहेरून आला असेल, तर तो भारतात पहिल्यांदा कुणी टाकला, हे सांगावे लागणार.
६) युजर्सचे व्हेरिफिकेशन कोणत्या मार्गाने केले गेले, त्याची माहिती द्यावी लागेल.
७) जर कुठल्या युजरचा डेटा किंवा ट्विट किंवा मजकूर हटवला गेला, तर तुम्हाला युजरला सांगावे लागेल आणि त्याची सुनावणी करावी लागेल.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top