Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
SRA : चेंबूर येथील झोपुप्राच्या समस्या निराकरण शिबिरात नागरिकांच्या प्रश्नांवर 'समक्ष जागेवर' कार्यवाही

SRA : चेंबूर येथील झोपुप्राच्या समस्या निराकरण शिबिरात नागरिकांच्या प्रश्नांवर 'समक्ष जागेवर' कार्यवाही

मुंबई : झोपडपट्टीमुक्त मुंबई घडविण्याच्या व प्रत्येक गरीब कुटुंबाला सुरक्षित व दर्जेदार हक्काचे घर देण्याच्या राज्य शासनाच्या संकल्पनेला पूर्णत्वास नेण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई थेट जनतेच्या दारात पोहचत आहे.

याच धर्तीवर प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चेंबूर विधानसभेचे आमदार तुकाराम काते यांच्या विशेष सहकार्याने चेंबूर येथील 'शगुन हॉल'मध्ये विशेष समस्या निराकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरातील सेवांचा चेंबूर परिसरातील १ हजारांहून अधिक झोपडपट्टीवासीयांनी लाभ घेतला.

नागरिकांच्या समस्यांचे तातडीने आणि एकाच छताखाली निराकरण करणे या मुख्य उद्देशाने आयोजित केलेल्या या शिबिरामध्ये पात्रता निर्धारण, प्रलंबित भाडे, सदनिकांचे वाटप, अभियांत्रिकी विभागाशी संबंधित अडचणी, रखडलेल्या पुनर्विकास योजना, दस्तऐवज पडताळणी तसेच विविध प्रशासकीय तक्रारी यांसंदर्भातील नागरिकांच्या समस्या मार्गस्थ करण्यात आल्या. अनेक प्रकरणात झोपु प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिबिराच्या ठिकाणीच कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी करून अनेक प्रकरणांवर जागेवरच तातडीने निर्णय घेतले. तर काही क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या प्रकरणांवर तातडीने सुनावणी घेऊन नागरिकांना न्याय देण्याची ग्वाही दिली. या शिबिरात अनेक वर्षांपासून हक्काच्या घराची प्रतीक्षा करणाऱ्या चेंबूरमधील पात्र नागरिकांना आमदार तुकाराम काते यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात त्यांच्या हक्काच्या घरांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. या शिबिरामुळे रखडलेले प्रश्न मार्गी लागल्याने चेंबूरमधील झोपडपट्टीवासीयांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि लोकप्रतिनिधींचे मनापासून आभार मानले. शिबिराला प्राधिकरणाचे विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिरास संबोधित करताना आमदार तुकाराम काते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'सर्वांसाठी घरे' हा संकल्प पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि झोपु प्रशासन अधिक वेगाने व लोकाभिमुख पद्धतीने काम करत आहे. झोपडपट्टीमुक्त मुंबईचे स्वप्न साकारणे हा शासनाचा आणि प्राधिकरणाचा ठाम निर्धार आहे. त्यामुळे प्राधीकरणाची पुनर्वसन प्रक्रिया नेमकी काय आहे, प्राधिकरणाशी संबंधित विविध विषय कोणते आहेत आणि त्या अनुषंगाने नागरिकांनी कोणाकडे संपर्क साधावा, याची स्पष्ट माहिती प्रत्येकाने करून घेणे आवश्यक आहे. आज प्रशासन स्वतः नागरिकांच्या दारी शिबिराच्या माध्यमातून आले आहे. त्यामुळे नागरिकांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, आवश्यक कागदपत्रे सादर करावीत आणि आपल्या समस्या अधिकृतपणे मांडाव्यात. शासन आणि प्राधिकरणाच्या नियमांच्या अधीन राहून प्रत्येक पात्र नागरिकाचे काम मार्गस्थ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी प्राधिकरणाने आयोजित केलेल्या या उपक्रमाबद्दल त्यांनी प्रशासनाचे विशेष आभार मानले. झोपु प्रशासन अत्यंत संवेदनशीलतेने आणि कटिबद्धतेने काम करत असून नागरिकांनी कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता आपल्या समस्या थेट प्रशासनाकडे मांडाव्यात असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची भूमिका स्पष्ट करताना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर म्हणाले की, झोपडपट्टीवासीयांच्या समस्या केवळ फाईलींमध्ये अडकून न राहता, थेट त्यांच्या परिसरात जाऊन सोडविण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. रखडलेल्या योजनांना गती देणे, पात्र लाभार्थ्यांना विनाविलंब घरे मिळवून देणे आणि संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता व विश्वासाचे वातावरण निर्माण करणे हेच समस्या निराकरण शिबिरांचे उद्दिष्ट आहे. यापूर्वी वांद्रे, अंधेरी, गोरेगाव, सायन आणि बोरिवली येथे आयोजित शिबिरांना मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर आता बृहन्मुंबईच्या विविध भागांत ही मोहीम अधिक तीव्र केली जाईल. प्रत्येक पात्र कुटुंबाला सन्मानाने जगता येईल, असे घर मिळवून देण्यासाठी झोपु प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध आहे, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कल्याणकर यांनी व्यक्त केला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar