Saturday, 14 Dec, 6.34 pm My महानगर

होम
सुज्ञांस अधिक सांगणे न लगे; संजय राऊतांचा राहुल गांधींना इशारा

'रेप इन इंडिया' या वादग्रस्त विधानावर राहुल गांधींनी देशाची माफी मागावी ही भाजपची मागणी राहुल गांधी यांनी फेटाळून लावली. एवढेच नाही तर माफी मागायला माझं नाव राहुल सावरकर नसल्याचं आणखी एक वादग्रस्त विधान त्यांनी आज रामलीला मैदानात काँग्रेसतर्फे आयोजित भारत बचाव रॅली दरम्यान केलं. पण यावर आता राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सुज्ञांस अधिक सांगणे न लागे, असे म्हणत राहुल गांधी यांना इशारा दिला आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांचं नाव घेत माफी मागण्यास नकार दिल्याने संजय राऊत यांनी ट्विटरवर राहुल गांधींच्या त्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे या बाबतीत तडजोड होणार नाही असे विधानसुद्धा संजय राऊत यांनी ट्विटमध्ये केले आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

राहुल गांधी यांनी आज पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले. त्यावर आता राज्यात मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने काँग्रेसच्या राहुल गांधींच्या वक्तव्याचा समाचार घेतला. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट केले की, 'वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहेत. सावरकर नावात राष्ट्राभिमान आहे. नेहरू, गांधी यांच्याप्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा. इथे तडजोड नाही.' तेव्हा याबाबतीत तडजोड होणार नसल्याचा इशारा संजय राऊत यांनी काँग्रेसला दिला आहे.

त्यांनी पुढे ट्विट केले की, 'आम्ही पंडीत नेहरू, महात्मा गांधी यांना मानतो. तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे'.

संजय राऊतांनी घेतला खरपूस समाचार

दरम्यान सत्तेतील गणितं न जुळल्याने शिवसेनेने २५ वर्ष जुन्या मित्रपक्षाला बगल देत यंदा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली. यावेळी कॉमन मिनीमम प्रोग्रामच्या आधारे ही आघाडी झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळेच वैचारिक मतभेद असलेले हे तिनही पक्ष विकासाच्या नावाने एकत्र आले. पण आता काँग्रेसचे राहुल गांधी यांनी वादग्रस्त विधान केल्याने महाराष्ट्रातील मित्रपक्ष शिवसेनेने मात्र त्यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच ज्याप्रमाणे आम्ही पंडीत नेहरू, महात्मा गांधी यांना मानतो. तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका. असे म्हटले आहे.

'माझं नाव राहुल गांधी आहे, सावरकर नाही, मी कदापी माफी मागणार नाही'

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top