Friday, 11 Jun, 3.40 am My महानगर

फिचर्स
सुख-दुःख मनावर अवलंबून आहे

जिथे रोग असेल तिथेच औषध लावले तर उपयोग होईल. दुःखाचे मूळ कुठे आहे हे प्रथम वे. प्रपंचात काही न्यूनता पडली की दुःख होते. श्रीमंताच्या किंवा गरिबाच्या सुख-दुःखात तसा फरक तो कोणता? एखाद्याजवळ पैसा पुष्कळ आहे, परंतु मूलबाळ नाही, म्हणून तो दुःखी असतो, तर दुसर्‍याला संतती आहे, पण पैसा नाही, म्हणून तो कष्टी होतो. तिसर्‍याला संतती, संपत्ती वगैरे सर्व आहे, परंतु पोटदुखीच्या विकाराने तो बेजार आहे. एकंदरीत, सुख-दुःखे कोणाला सुटत नाहीत.

जितक्या गोष्टी कमी पडल्या तितक्या प्रयासानेसुद्धा आणल्या, तरी पण न्यूनता काही सरत नाही. दुःखावर आपण वरवर उपाय करतो, परंतु आपल्या दुःखाच्या मुळाशी आपले मनच आहे हे नाही आपल्या ध्यानात येत. खरोखर, सुख-दुःख हे वस्तूत नसून आपल्या मनःस्थितीवरच अवलंबून आहे. वस्तू चोरीला गेली त्या वेळी झोपेत, आनंदात होता, पण जागे झाल्यावर, वस्तू गेल्याचे समजल्यावर दुःखी झाला. म्हणजे दुःखी होते ते मन. तेव्हा, औषध द्यायचे ते मनाला द्या. संतांनी मनाला शिकवण दिली. आजवर आम्ही विषयसुख सख्ख्या मुलाप्रमाणे भोगले, आणि परमार्थ सावत्र मुलासारखा केला. सावत्र आईप्रमाणे आम्ही मनाला शिकविले.

ज्याचा सहवास झाला, त्याप्रमाणे मनावर परिणाम होऊ लागले. विषयाचा सहवास गर्भापासून आपण ठेवतो, म्हणून विषयापासून मिळणारा आनंद खरा मानू लागलो. ज्याचे बीज लावावे त्याची फळे खावी. आपण विषयाचे बी पेरतो, आणि विषयाची फळे दुःखदायक आहेत म्हणून मग शोक करतो, याला काय करावे ? व्यापारी दरवर्षी आढावा घेतात त्याप्रमाणे, माझे विषय किती कमी झाले हे आपण वे. जितकी प्रपंचाकरिता तळमळ करतो, तितकी भगवंताकरता करावी. प्रपंचातल्या अनुकूल परिस्थितीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती हीच परमार्थाला जास्त उपकारक आहे.

परमार्थ हा परिस्थितीवर, श्रीमंती-गरीबीवर, रोगी-निरोगीपणावर वगैरे कशावरही अवलंबून नाही. मनाची स्वस्थता, अंतःशुद्धता, आचरणाची पवित्रता, यांवर अवलंबून आहे. प्रपंचातल्या सोयी आणि गैरसोयी या दोन्ही परमार्थाच्या आड येतात. आपण रस्त्यातून चाललो असताना, एखादे अत्तराचे दुकान पाहून थांबलो काय किंवा मिरच्यांचे दुकान पाहून थांबलो काय, रस्ता चालण्याच्या दृष्टीने दोन्ही घातकच ठरतात. प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही, आपण आपली आसक्ति त्यात कालवतो म्हणून आपल्याला तो सुख-दुःख देतो, ही आसक्ति काढणे, याचेच नाव परमार्थ होय.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top