Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Suman Kalyanpur : संगीत विश्वावर शोककळा; ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांचे निधन

Suman Kalyanpur : संगीत विश्वावर शोककळा; ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांचे निधन

मुंबई : भारतीय संगीत विश्वातील सुवर्णकाळाच्या साक्षीदार आणि आपल्या अवीट गोड आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.

त्यांनी वयाच्या 89 वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एक दैदिप्यमान तारा निखळल्याची भावना व्यक्त होत असून, संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

सुमन कल्याणपूर यांच्याबद्दल सांगायचे तर त्यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी ढाका (सध्याचे बांगलादेश) येथे झाला. त्यांचे माहेरचे नाव सुमन हेमाडी असे होते. रामानंद कल्याणपूर यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्या मुंबईत आल्या. सुमन कल्याणपूर यांनी शास्त्रीय संगीताचा अगदी कसून अभ्यास केला वडिल शंकरराव हेमाडी आणि आई सिताबाई यांच्या मार्गदर्शनात त्यांनी संगीताचे सुरवातीचे धडे गिरवले. तसेच त्यांनी लग्नापूर्वीही अनेक गाणी गायली. बालपणापासूनच चित्रकला आणि संगीताची आवड असलेल्या सुमन कल्याणपूर यांनी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून शिक्षण घेतले. मात्र, त्यांच्या गळ्यातील उपजत गोडव्यामुळे त्यांनी संगीतालाच आपले जीवन मानले. 1954 मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायिका म्हणून पदार्पण केले. त्यानंतर 60 आणि 70 च्या दशकात त्यांनी मोहम्मद रफी, मुकेश, किशोर कुमार आणि मन्ना डे यांसारख्या दिग्गज गायकांसोबत अनेक अजरामर ड्युएट्स गायली. विशेषतः मोहम्मद रफी यांच्यासोबतची त्यांची गाणी कमालीची लोकप्रिय ठरली. 'आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे', 'ना तुम हमें जानो' ही त्यांची हिंदी गाणी आजही तितकीच आवडीने ऐकली जातात.

मराठी भावसंगीतावर अधिराज्य

हिंदी चित्रपटसृष्टी गाजवत असतानाच सुमन कल्याणपूर यांनी मराठी सुगम संगीतातही आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. 'शब्द शब्द जपुन ठेव', 'केतकीच्या वनी येथे', 'पाखरा जा रे दूर देशी' आणि 'मृदुल करांनी छेडित तारा' यांसारखी त्यांची भावगीते मराठी माणसाच्या मनावर कायमची कोरली गेली आहेत. त्यांचा आवाज गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजाशी साधर्म्य दर्शवणारा होता, तरीही त्यांनी आपल्या गायकीची एक वेगळी आणि अवीट ओळख जपली. मराठी, हिंदी व्यतिरिक्त त्यांनी बंगाली, गुजराती, पंजाबी आणि ओडिसी अशा अनेक भाषांमध्ये 800 हून अधिक गाणी गायली. त्यामुळे भारतीय संगीत क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल केंद्र सरकारने 2023 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. याशिवाय त्यांना महाराष्ट्र शासनाचा 'लता मंगेशकर पुरस्कार' आणि 'गदिमा पुरस्कार' देखील मिळाला. त्यामुळे सुमन कल्याणपूर यांच्या जाण्याने भारतीय संगीतातील एका सुश्राव्य अध्यायाचा अंत झाला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar