उन्हाळ्यात घाम येणे आणि थकवा येणे या सामान्य समस्या आहेत. या दिवसात हृदयाच्या ठोक्यांमध्येही बदल होतो. साधारणपणे शरीरातील या बदलांना हवामानाचा बदल असे समजले जाते. पण तीव्र उष्णतेमुळे, डिहायड्रेशनमुळे ब्लड प्रेशरवर परिणाम होऊ शकतो.
परिणामी, हृदयविकाराच्या झटक्याचा धोका वाढतो. त्यामुळे कडाकाच्या उन्हातही हृदयाची काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे.
धोका का वाढतो?
जेव्हा उन्हामुळे शरीरातून जास्त घाम बाहेर पडतो, तेव्हा शरीरातील पाणी आणि क्षारांचे प्रमाण कमी होते. यामुळे रक्त घट्ट होते आणि ते शरीरात प्रवाहित करण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत करावी लागते. त्वचा थंड ठेवण्यासाठी रक्ताभिसरण वेगाने होते, ज्यामुळे रक्तदाब अचानक कमी-जास्त होऊ शकतो. या प्रक्रियेत हृदयावर अतिरिक्त ताण पडतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता निर्माण होते.
साधारण लक्षणे -
- तुम्हाला श्वास घेताना अडथळा जाणवत असेल किंवा छातीत जळजळ होत असते हे धोक्याचे लक्षण असू शकते.
- एसीमध्ये बसलेले असताना तुम्हाला अचानक खूप घाम येत असेल तर हे ब्लड प्रेशर कमी झाल्याचे लक्षण आहे.
- सतत मळमळ, उलट्या होणे किंवा हृदयाचे ठोके वाढणे हे देखील धोक्याची सूचना आहे.
- तुम्हाला उन्हात असताना अचानक चक्कर येत असेल हे शरीरातील पाणी कमी झाल्याचे लक्षण असून हृदयासाठी धोक्याचे ठरू शकते.
- जास्त प्रमाणात जुलाब झाल्यास शरीरातील पाणी आणि मीठ बाहेर पडते. ज्यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येतो आणि क्लॉलिंग होण्याचा धोका निर्माण होतो.
कोणाला अधिक धोका?
विशेषतः ज्येष्ठ नागरिक, आधीच हृदयविकार किंवा मधुमेह असलेले रुग्ण आणि उन्हात काम करणाऱ्या मजुरांना याचा फटका सर्वाधिक बसतो. अतिउष्णतेमुळे येणाऱ्या घामाद्वारे शरीरातील सोडियम आणि पोटॅशियम सारखी महत्त्वाची खनिजे वाहून जातात. यामुळे हृदयाचे ठोके अनियंत्रित होतात, ज्याला वैद्यकीय भाषेत 'अरिथमिया' म्हणतात.
तज्ज्ञांचा सल्ला -
या दिवसात थेट उन्हात जाणे टाळावे. शरीरात पाण्याची कमतरता भासू न देण्यासाठी भरपूर पाणी, लिंबू पाणी, ताक किंवा ओआरएसचे सेवन करावे. चक्कर येणे, छातीत जडपणा जाणवणे किंवा अस्वस्थ वाटल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.

