Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Suresh Bhat : चांदण्यात फिरताना.

Suresh Bhat : चांदण्यात फिरताना.

- डॉ. अशोक लिंबेकर

सुरेश भट हे मराठी कवितेला मलमली तारुण्याचे सौंदर्य देणारे वैदर्भीय प्रतिभावंत. ग्रेससोबत त्यांनी मराठी कविता उजळवली. गझल मराठीत रुजवून ते 'गझलसम्राट' झाले.

हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीताने आणि आशा भोसले यांच्या आवाजाने त्यांची 'तरुण आहे रात्र अजुनी', 'मालवून टाक दीप'सारखी शृंगारिक गीते अजरामर झाली. त्यांच्या कवितेत रात्र, चंद्र, चांदणे तरलतेने व्यक्त झाले. 'लाभले आम्हांस भाग्य'मधून मराठीचा गौरव करणारे भट, 'पेटवा मशाली'मधून क्रांतीही बोलतात. बेतलेली गाणी न लिहिणारा हा मनस्वी कवी शब्द-सुरांचा जाणकार होता.


मराठी कवितेला मलमली तारुण्याचे सौंदर्य बहाल करणारे आणि आपल्या काव्यलेखनाने मराठी कवितेला पहाटेच्या चांदण्यात न्हाऊ घालणारे प्रतिभावान कवी म्हणजे सुरेश भट. सुरेश भट हे वैदर्भीय कवी. विदर्भातील ग्रेस आणि भट या जोडगोळीने मराठी कविता उजळून टाकली. ग्रेसने तिला गूढ गहनतेचे तात्त्विक अधिष्ठान दिले तर सुरेश भटांनी सहज, साध्या, दळदार, सुंदर शब्दांनी तिला खुलवले. मराठीत गझल रुजवली, फुलवली ती त्यांनीच. म्हणूनच गझलसम्राट म्हणून ते ओळखले जातात. मराठी गाण्याला अभिजात शृंगाराच्या तरल भावात न्हाऊ घातले ते सुरेश भट यांच्या गाण्यांनी. त्यांची बरीच गाणी हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केली आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या काही गाण्यातील शृंगार बघून ती लता मंगेशकर यांनी गायली नाहीत. तीच गाणी आशा भोसले यांनी गायली आणि ती इतकी रसिकमान्य आणि प्रसिद्ध झाली की ती आजही ऐकली जातात. स्त्री-पुरुष प्रेमातील रतीभाव व्यक्त करणारी त्यांची 'तरुण आहे रात्र अजुनी', 'मालवून टाक दीप' ही गाणी अजरामर झाली आहेत.

स्त्री-पुरुष नात्यातील सर्वात सुंदर बाब म्हणजे प्रेम आणि मिलन. ही भावना सुरेश भट यांनी इतक्या तरलपणे आणि सुंदर रीतीने मांडली की त्यात कुठेही भडकपणा अथवा अश्लीलतेचा लवलेशही दिसत नाही. गीतांना सुंदर प्रतिकांत गुंफून त्यांनी इतक्या नजाकतीने पेश केले की अजूनही त्यांच्या मेंदीच्या पानांचा रंग मिटत नाही. संत साहित्यातील मधुरा भक्तीत, ती विरहिणी ज्या उत्कटतेने प्रेमभाव व्यक्त करते, तशीच उत्कट विरहिणी आणि तिचे सालस रूप भटांच्या गीतांतून दिसते. सुरेश भट यांच्या गाण्यात आपणास रात्रीची विविध रूपे दिसतात. रात्र, चंद्र, चांदणे हे तर प्रेमी युगुलांचे सर्वात देखणे आणि आवडणारे निसर्गरूप. हे रूप कोणत्याही नवथर प्रेमिकांना भुरळ घालणारेच. भटांच्या गाण्यात हीच रात्र, हेच चंद्र-चांदणे चित्रित झाले तेही इतक्या देखण्या शब्दात की या प्रतिमांनी तमाम मराठी मनाला चांदण्यात न्हाऊ घातले. हातात हात गुंफून त्यांना चांदण्या रात्रीत फिरायला लावले. चांदण्या रात्रीतला तो पौर्णिमेचा स्पर्श आणि ते हृदयनाथ मंगेशकरांचे स्वरचांदणे कोण बरे विसरेल? म्हणूनच 'चांदण्यात फिरताना धरलास तू माझा हात', 'सख्या रे आवर ही सावर ही चांदरात' अशी म्हणणारी त्यांची प्रेमिका आपल्यालाही मनाने त्या चांदण्या रात्रीच्या शीतल चांदण्यात प्रवास करायला लावते. ही गाणी आशा भोसले यांनी गायली आणि ती अजरामर झाली.

आशा भोसले त्यांच्या या गीताबाबत खूपच पझेसिव्ह होत्या हे त्यांनी सुरेश भट यांच्या 'सप्तरंग' या संग्रहाच्या प्रस्तावनेत सांगितले आहे. 'केव्हा तरी पहाटे आणि चांदण्यात फिरताना ही गाणी फक्त माझी आहेत. ही गाणी मला दिसतात, मला भेटतात. मी त्याबाबतीत खूप पझेसिव्ह आहे.' आशाबाई हे एक उदाहरण झाले. कारण त्यांच्या अनेक भावकविता आणि त्यातील नाजूक, उत्कट शृंगाराने मराठी मनाला भुरळ घातली. त्यांच्या कवितेतील मेंदीचा रंग असो की 'धुंद चांदणे' या शब्द-सुरांनी आपल्याला अक्षरश: न्हाऊ घातले. 'मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे', 'मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे', 'केव्हा तरी पहाटे', 'मी मज हरपून बसले गं', 'मालवून टाक दीप', 'तरुण आहे रात्र अजुनी', 'सूर मागू तुला मी कसा', 'पहाटे पहाटे मला जाग आली', 'उष:काल होता होता काळरात्र झाली' या त्यांच्या अजरामर कविता. खरे तर या भावकविताच. शब्द-सुरांची उत्तम जाण असलेला कवीच इतके सर्वोत्तम गाणं लिहू शकतो.

भटांच्या बाबतीत ते वास्तविक होते. कारण संगीताची आणि रागदारीची उत्तम जाणीव त्यांना होती. त्यांना स्वत:ला अनेक वाद्ये वाजवता येत होती. संगीताच्या आणि मैफलीच्या सहवासात रमलेला हा अवलिया कलावंत होता. म्हणूनच इतकी नितांत सुंदर कविता त्यांनी मराठीला दिली. मराठी भाषेवर असलेले त्यांचे प्रेम तर सर्वश्रुतच. 'लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी' असे म्हणत त्यांनी केलेला मराठीचा सार्थ गौरव सर्वांच्या ओठी आहे. ही त्यांची काव्यप्रेरणा सामान्य माणसांच्या आणि समष्टीच्या हिताचीच भाषा बोलत होती. स्वातंत्र्य मिळाले, पण काहीच साध्य झाले नाही. सामान्य माणूस, त्याचे प्रश्न सुटले नाहीत. त्यांच्या आयुष्यातील अंधार दूर झाला नाही. अशा वेळी भटांची कविता प्रखर होऊन क्रांतीची भाषा बोलते. 'अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली' या प्रखर भाषेतून त्यांनी पुन्हा समाजाला जागृत केले. भट यांची ही क्रांतिकारक गीते अजूनही सामाजिक शोषणावर प्रखर झोत टाकतात. विझलेल्या मनाला चेतवण्याचे सामर्थ्य भटांच्या गाण्यात होते. एकीकडे त्यांची गाणी जशी मनाला हळवी करतात, तशीच प्रखर वास्तवाचे भान देऊन डोळ्यात अंजनही घालतात. जेव्हा त्यांच्या कविता मंगेशकर भावंडांच्या हाती गेल्या, तेव्हा त्यांचेही कुतूहल जागे झाले होते. इतके तरल लिहिणारा हा कवी प्रत्यक्षात कसा असेल, कसा दिसत असेल? पण वास्तवात सुरेश भट यांचे दिसणे आणि त्यांची कविता यात खूप अंतर होते. भटांच्या सर्वांगसुंदर प्रतिभेनेच त्यांची कविता प्रतीकात्मक, देखणी केली. 'जे न देखे रवी ते देखे कवी' ही उक्ती त्यांच्या शब्दकळेला आणि प्रतिभेला संवादी अशीच होती. भटांच्या अनेक कविता संगीतबद्ध झाल्या आहेत. त्यांची सर्वच गाणी अग्रगण्य अशीच. मराठी भावगीताला त्यांनी समृद्ध केले. त्यांची अनेक गाणी चित्रपटांत चित्रित झाली. विशेष म्हणजे बेतलेली गाणी त्यांनी कधीच लिहिली नाहीत.

याबाबत एक आठवण अशी. जयश्री गडकर यांनी भटांना गाणी लिहिण्यासाठी आग्रह केला. त्यांची ही विनंती त्यांनी मान्य केली आणि मुंबईत एका आलिशान हॉटेलमध्ये भट गाणी लिहिण्यासाठी थांबले. सगळा पाहुणचार जयश्रीबाईंचा. कित्येक दिवस झाले पण भटांकडून गाणे काही लिहून होईना. शूटिंग थांबवण्याची वेळ आली. भटांचे हॉटेलचे बिल वाढतच चालले. शेवटी नाईलाजाने जयश्रीबाई म्हणाल्या, 'आता दोन दिवसांचे हॉटेलचे बिल भरले आहे. या दिवसात गाणे झाले तर ठीक, नाहीतर राहू द्या.' पण दुसर्‍याच दिवशी भटांनी हॉटेल सोडले आणि ते नागपूरला जाण्यासाठी निघाले. जयश्रीबाईंना हे जेव्हा कळले तेव्हा त्यांना वाईट वाटले. एक मनस्वी कलावंत दुखावला गेला, म्हणून त्या तशाच दादर स्टेशनवर गेल्या. भट गाडीत एका खिडकीत निवांत बसलेले. ट्रेन निघण्यास काही अवकाश. जयश्रीबाईंनी माफी मागितली. यावेळी सुरेश भटांनी एक कागद त्यांच्या हातावर ठेवला आणि सांगितले, 'ही कविता सकाळीच सुचली नि लगेच लिहिली. माफ करा, तुमचा वेळ घेतला, पण कविता लिहिण्यास काळ, वेळ यांचे काही परिमाण नसते. ती उत्स्फूर्त असते.' घरी येऊन ती कविता जयश्रीबाईंनी वाचली, ते गाणे होते 'सुन्या सुन्या मैफलीत माझ्या'. हेच गाणे पुढे 'उंबरठा'मधून प्रसिद्ध झाले.

(लेखक साहित्यिक आणि समाजसंस्कृतीचे अभ्यासक आहेत.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar