Monday, 18 Jan, 10.27 pm My महानगर

ताज्या बातम्या
सुशांत सिंह प्रकरणी उच्च न्यायालयाने रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊला फटकारले

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी प्रसारमाध्यमांकडून करण्यात आलेल्या वृत्तांकनावरुन मुंबई उच्च न्यायालयाने रिपब्लिक टीव्ही (Republic TV) आणि टाइम्स नाऊ (Times Now) यांना फटकारले आहे. या प्रकरणात झालेल्या 'मीडिया ट्रायल'ची सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयाने दोन्ही वृत्तवाहिन्यांनी केलेले वृत्तांकन प्रथमदर्शनी अवमानकारक असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्याविषयी कारवाई करण्याचे निर्देश देण्यास आम्ही तूर्तास टाळत असल्याचे उच्च न्यायालयाने सांगितले.

मुंबई पोलिसांवरील टीका अयोग्य

वृत्तवाहिन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्या कोणतीही यंत्रणा नाही. वृत्तवाहिन्यांच्या संघटनेने केलेल्या प्राधिकरणाला वैधानिक अधिष्ठान नाही, असे महत्त्वाचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. सध्या वृत्तवाहिन्यांनी प्रेस कौन्सिल इंडिया कायद्यातील तरतुदींचे पालन करावे, असे आदेशही त्यांनी दिले आहेत. तसेच या वृत्तवाहिन्यांनी या प्रकरणादरम्यान मुंबई पोलिसांवर केलेली टीका अयोग्य असल्याचेही उच्च न्यायालयाने यावेळी सांगितले.

आमचा काय फायदा?

आत्महत्यांच्या प्रकरणात वार्तांकन करताना वृत्तवाहिन्या आणि मुद्रित माध्यमांसाठी आम्ही मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. त्यानुसार चर्चेचे कार्यक्रम आयोजित करताना त्यात कोणत्याही व्यक्तीचे चारित्र्य हनन करू नये, गुन्ह्यातील पीडित व्यक्ती, साक्षीदार यांच्या मुलाखती घेऊन गुन्ह्याच्या घटनेचे विश्लेषण करू नये, आरोपींचे फोटो प्रसिद्ध करू नयेत, गुन्ह्याच्या घटनेचे नाट्य रूपांतर मांडू नये, तपासातील संवेदनशील माहिती प्रसिद्ध करू नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. 'जर तुम्हीच तपास करणारे, फिर्यादी आणि न्यायाधीश झालात तर मग आमचा काय फायदा?' अशी विचारणा न्यायालयाने रिपब्लिक टीव्हीची बाजू मांडणाऱ्या वकिलांना केली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top