Dailyhunt
Swati Maliwal : केजरीवाल सर्वात मोठे विश्वासघातकी, 200 रुपयाचं काम अन्.; स्वाती मालीवाल पहिल्यांदाच बोलल्या

Swati Maliwal : केजरीवाल सर्वात मोठे विश्वासघातकी, 200 रुपयाचं काम अन्.; स्वाती मालीवाल पहिल्यांदाच बोलल्या

वी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या राघव चड्ढा, अशोक कुमार मित्तल, संदीप पाठक, हरभजन सिंग, विक्रमजीत सिंग साहनी, राजिंदर गुप्ता आणि स्वाती मालीवाल या सात खासदारांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला.

यानंतर आम आदमी पक्षाने सातही खासदारांवर गंभीर आरोप केले होते. मात्र आता राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी आपल्या जुन्या पक्षावर आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर उघडपणे गंभीर आरोप केले आहेत. 'आप'च्या कार्यपद्धतीवर, नेतृत्वाच्या दृष्टिकोनावर आणि राजकीय नैतिकतेवर जोरदार हल्ला चढवताना स्वाती मालीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांना "सर्वात मोठे विश्वासघातकी" असे संबोधले आहे.

माध्यमांशी संवाद साधताना स्वाती मालीवाल म्हणाल्या की, जर कोणाला 'विश्वासघातकी' म्हणण्याचा अधिकार असेल, तर ती व्यक्ती मी नसून, खुद्द अरविंद केजरीवाल आहेत. कारण ज्या व्यक्तीने एकेकाळी भ्रष्टाचाराविरुद्धच्या चळवळीचे नेतृत्व केले होते, त्याच व्यक्तीने पुढे जाऊन ज्यांना एकेकाळी 'भ्रष्ट' म्हणून हिणवले होते, अशाच लोकांशी हातमिळवणी करणे पसंत केले. तत्त्वांशी तडजोड करणे, जनतेची दिशाभूल करणे आणि आपल्या मूळ आदर्शांना तिलांजली देणे हाच खऱ्या अर्थाने 'विश्वासघात' आहे, अशा शब्दात त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला.

200 रुपयांचे काम आणि 200 कोटींची प्रसिद्धी

"केवळ पत्रकार परिषदांचे सरकार" असा आम आदमी पक्षाचा उल्लेख करताना स्वाती मालीवाल म्हणाल्या की, या पक्षात प्रत्यक्ष प्रशासनापेक्षा केवळ 'नाटकीपणा'च अधिक चालतो. कारण सकाळीच एक विशिष्ट 'कथानक' (narrative) तयार केले जायचे आणि त्यानंतर दिवसभर त्याच विषयावर पत्रकार परिषदा घेण्याचे निर्देश दिले जायचे. सरकारकडून तळागाळातील स्तरावर अत्यंत मर्यादित स्वरूपात प्रत्यक्ष काम केले जात असताना त्याच्या प्रसिद्धीवर आणि प्रचारावर मात्र प्रचंड प्रमाणात पैसा उधळला जात होता. म्हणजे "200 रुपयांचे काम करायचे आणि त्यावर 200 कोटी प्रसिद्धीसाठी खर्च करायचे," हेच या सरकारचे मुख्य वैशिष्ट्य बनले असल्याचा उपाहासात्मक टोलाही त्यांनी लगावला.

पक्षात हुकूमशाहीचे वातावरण

स्वाती मालीवाल यांनी आरोप केला की, आम आदमी पक्षातील आमदारांना आणि मंत्र्यांना अनेकदा अशी कामे करण्यास भाग पाडले जात होते, जी नैतिकदृष्ट्या समर्थनीय नव्हती. याच कारणामुळे, निवडणुका लढवण्याचा दबाव असूनही आपण कधीही आमदार किंवा मंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली नाही. कारण पक्षात हुकूमशाहीचे वातावरण आहे. खरं तर 'आम आदमी पार्टी'ने दिल्लीची अवस्था अत्यंत दयनीय करून ठेवली आहे आणि आता तशीच परिस्थिती पंजाबमध्येही दिसून येत आहे. दिल्लीत ज्या नेत्यांना जनतेने नाकारले होते, तेच नेते आता पंजाबचा कारभार पाहत आहेत. त्यामुळे तिथे भ्रष्टाचारात प्रचंड वाढ झाली आहे. ज्या व्यक्तींवर महिलांच्या शोषणाचे आरोप आहेत, अशा व्यक्ती सध्या पंजाब सरकारमध्ये अत्यंत प्रभावशाली पदांवर विराजमान आहेत.

…म्हणून 'आप' पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला

दरम्यान, 'नारी शक्ती वंदन अधिनियम' म्हणजेच महिला आरक्षणाशी संबंधित कायदा याचा संदर्भ देत मालीवाल यांनी एक महत्त्वपूर्ण खुलासा केला. त्यांनी सांगितले की, या विधेयकाला विरोध करण्याच्या सूचना आम्हाला पक्षाच्या नेतृत्वाकडून मिळाल्या होत्या. मात्र, महिलांच्या हक्कांसंबंधीच्या कोणत्याही कायद्याला कधीही विरोध न करण्याचा ठाम निश्चय केला असल्याने त्याच क्षणी मी असा निर्णय घेतला की, यापुढे आपण या पक्षाचे सदस्य म्हणून राहू शकत नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar