नवी दिल्ली : 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज म्हणजेच सोमवारी (4 मे) समोर येणार आहे. सोमवारी सकाळी सुरु झालेल्या मतमोजणीकडे सर्व देशांचे लक्ष लागले आहे. एकीकडे पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी लढाई दिसत असून सर्व देशाचे लक्ष लागले आहे.
अशामध्ये दुसरीकडे तामिळनाडूच्या पहिल्या काही कलांमध्ये एक मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पहिल्यांदाच लढणाऱ्या अभिनेता थलपती विजयच्या टीव्हीके पक्षाने प्रस्थापितांना मोठा धक्का दिला आहे. सकाळी 9.30 पर्यंत कलांनुसार, टीव्हीके सर्वाधिक 80 हून अधिक जागांवर आघाडीवर होते. तर, डीएमके 45 तर एडीएमके हे 55 हून अधिक जागांवर आघाडीवर होते.
पदार्पणातच टीव्हीकेने दमदार कामगिरी केली आहे. तमिळनाडू विधानसभेच्या 234 जागांसाठी मतदान पार पडले होते. या निवडणुकीत मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वात सत्ताधारी डीएमके-काँग्रेस आघाडी सत्ता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तर, एआयएडीएमके-भाजप आघाडी तमिळनाडूवर नियंत्रण मिळवण्याचे लक्ष्य ठेवत आहे. या लढाईत अभिनेते आणि नुकतेच राजकारणात पदार्पण केलेले विजय आणि त्यांचा पक्ष टीव्हीकेने सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. दरम्यान, स्वतः विजय हा तिरुचिरापल्ली मतदारसंघातून उभा असून त्याने डीएमकेच्या इरुदयराज यांना मागे टाकत अनेकदा आघाडी घेतल्याचे समोर आले.
थलपथी विजयने राजकारणासाठी सोडले चित्रपट
थलपथी विजय हा तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता आहे. पण, राजकारणात आल्यानंतर त्याने चित्रपटांमधील काम सोडले. तमिळनाडूच्या लोकांना भ्रष्टाचार, जातीभेद, धर्मभेदमुक्त कार्यक्षम प्रशासन हवे आहे, त्यासाठीच आपण प्रयत्न करणार आहोत, असे आश्वासन त्याने जनतेला दिले होते. एकीकडे टीव्हीके आघाडीवर असतानाच तमिळनाडूमधील राजकीय हालचालींनी आतापासूनच वेग घेतला आहे. भाजपने थलपथी विजयशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तमिळनाडू भाजपच्या उपाध्यक्ष खुशबू सुंदर यांनी एआयडीएमकेच्या नेतृत्त्वात आघाडी बहुमताच्या जवळ पोहोचल्यास विजयसह त्याच्या पक्षाला एनडीएमध्ये सहभागी होण्यासाठी पक्षाचे दरवाजे खुले असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता विजय किंग ठरणार की किंगमेकर? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

