Sunday, 03 Nov, 5.52 am My महानगर

क्रीडा
तेव्हा मी 21 खेळाडूंविरोधात खेळायचो

पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रावळपिंडी एक्स्प्रेस नावाने ओळखला जाणार्‍या शोएब अख्तरने मॅच फिक्सिंगसंदर्भात एक मोठे विधान केले आहे. एका मुलाखतीमध्ये बोलत असताना शोएबने, आपल्या कार्यकाळात मी २१ खेळाडूंविरोधात खेळायचो असे विधान केले आहे. यातले ११ खेळाडू हे प्रतिस्पर्धी संघाचे असायचे तर १० खेळाडू हे माझ्याच संघातील असायचे. मी कधीही मॅच फिक्सिंगसारख्या प्रकारात अडकलो नाही. माझ्यासोबत मोहम्मद आमिर आणि मोहम्मद आसिफसारखे फिक्सर खेळाडू होते. पण मी यापासून स्वतःला नेहमी दूर ठेवले,असे शोएब म्हणाला आहे.

यावेळी बोलत असताना शोएब म्हणाला, मोहम्मद आसिफने माझ्याकडे मॅच फिक्सिंग केल्याची कबुली दिली होती. आमिरही या प्रकारात सहभागी होता. मी या दोघांनाही मारणार होतो, पण ते माझ्या हाती लागले नाही. मी त्यावेळी भिंतीवर माझा राग काढला होता. पाकिस्तानचे दोन चांगले गोलंदाज फिक्सिंगमुळे वाया गेले. या खेळाडूंनी देशाला विकण्याचे काम केले आहे, माझ्या दृष्टीने हा गुन्हा आहे,अशी खंत अख्तरने बोलून दाखवली.

मी ज्यावेळी मैदानात उतरायचो त्यावेळी माझ्या मनात कायम एकच विचार असायचा, तो म्हणजे मी माझ्या देशाला कधीही दगा देणार नाही. माझ्या संघात आजुबाजूला फिक्सर खेळत असताना मी कधीच त्यामध्ये सहभागी झालो नाही. कधीकधी मलाच कळायचे नाही की कोण मॅच फिक्सिंग करतेय आहे आणि कोण नाही,असेही शोएब म्हणाला.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top