बीड : शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे हे सततच्या बदली सत्रामुळे कायम चर्चेत असतात. 31 मार्च 2026 रोजी त्यांची मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य, महसूल आणि वन विभाग सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.
यानंतर दोनच दिवसांनी तुकाराम मुंढे यांच्या आई आसराबाई हरिभाऊ मुंढे यांचं पुण्यात निधन झालं. मात्र तुकाराम मुंढे यांनी दहावा आणि तेराव्याला बगल देत आज (05 एप्रिल) तिसऱ्याच दिवशी त्यांच्या आईच्या अस्थींचे विसर्जन नदीत न करता आपल्याच शेतात खड्डा खोदून, तिथे त्यांनी वडाचे झाड देखील लावले. यामागील कारण देखील तुकाराम मुंढे यांनी सांगितले आहे.
तुकाराम मुंढे फेसबुक पोस्ट करताना म्हणाले की, आमच्या "बाईंच्या" (आईच्या) स्मृतीप्रत्यर्थ आम्ही एक वेगळी आणि विचारपूर्वक वाट निवडण्याचा, संवेदनशील व विवेकवादी निर्णय मुंढे परिवारातर्फे घेतला आहे. "निसर्ग हाच या सृष्टीचा निर्माता आणि सर्वश्रेष्ठ शक्ती आहे. त्याचे रक्षण, संवर्धन आणि सन्मान करणे हीच खरी भक्ती आणि खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आहे." या विचारातून प्रेरित होऊन आम्ही आईच्या अस्थींचे पारंपरिक पद्धतीने नदीत विसर्जन न करता, त्या शेतात वृक्षारोपणासह विसर्जित केल्या आहेत. आम्ही त्या ठिकाणी वडाचे झाड लावले आहे, जेणेकरून आमच्या "बाईंची" माया सावलीच्या रूपाने पिढ्यानपिढ्या जिवंत राहील. हा वटवृक्ष आमच्या बाईंच्या मायेची सावली आणि "जीजींचे" आशीर्वाद बनून पिढ्यानपिढ्या बहरत राहील, असा विश्वास व्यक्त करतानाच आम्ही सर्व भाऊ आमच्या आईला "बाई" म्हणून संबोधित असू, तर गावकरी आणि आप्तेष्टांसाठी त्या "जीजी" होत्या, असेही त्यांनी सांगितले.
तुकाराम मुंढे म्हणाले की, आम्ही कोणत्याही प्रकारचा दहावा किंवा तेरवा न करण्याचा निर्णय घेतला आहे. विवेकवाद आणि विज्ञानाची कास धरून, सामाजिक उपयुक्ततेला आम्ही प्राधान्य दिले आहे. आजच्या आधुनिक युगात विज्ञानाची कास धरणे गरजेचे आहे. त्यामुळे सामाजिक उपयुक्तता आणि पर्यावरणाचे रक्षण करणे, हेच आमच्या आईच्या संस्कारांना साजेसे ठरेल, असे आम्हाला वाटते. आमच्या या निर्णयाचा आपण आदर कराल आणि "बाईंच्या" आठवणी आपल्या हृदयात कायम जपून ठेवाल, अशी अपेक्षा देखील तुकाराम मुंढे यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.
हेही वाचा - Baramati Election : बारामती पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच; सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेस उमेदवार जाहीर

