सोलापूर : शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी ( अजित पवार ) आणि भाजप अशी युती राज्यात आहे. तरी सोलापूर जिल्ह्यात निधी वाटपा संदर्भात भाजपच्या पालकमंत्र्यांकडून समन्वय साधला जात नाही. तर आम्ही रत्नागिरी जिल्ह्यात समन्वय साधणार नाही, असा इशारा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला.
बुधवारी टेंभुर्णी ( ता. माढा ) येथे शिंदेसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे भाजपवगळता जिल्ह्यातील इतर युतीच्या पक्षातील कार्यकर्त्यांना वेगळी वागणूक देत असल्याच्या तक्रारी भरसभेत करण्यात आल्या. भाजप युतीतील कार्यकर्त्यांना प्रचंड त्रास देत आहे. सत्ता असूनही एक रूपयाचे काम होत नाही. निधी मंजूर होत नाही, अशी तक्रार संजय कोकाटे यांनी केली होती. यावर मंत्री सामंतांनी भाजपसह पालकमंत्री गोरेंना थेट इशाराच देऊन टाकला आहे.
शिंदे अन् BJPमध्ये तणाव असतानाच राऊतांनी केले मोठे विधान; नेमकं ठाकरेंच्या मनात चाललंय काय?
उदय सामंत म्हणाले, "आम्ही पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी बोलणार आहोत. त्यांनी नाही ऐकले तर रत्नागिरीत जशास तसे वागू. भाजपची विधान परिषद यादी ही दिल्लीतून प्रसिद्ध होणार आहे. पण, आम्ची विधान परिषदेची यादी ही मुंबईतून प्रसिद्ध होईल. स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यादी प्रसिद्ध करतील."
कार्यकर्त्यांना कानपिचक्या…
पदाधिकारी आढावा बैठकीत मंत्री उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांची शाळा घेऊन कान पिचक्या दिल्या. "पदाधिकारी निवडीनंतर कार्यकर्ते पदे घेऊन आपल्या मतदार संघात कमी व मुंबईत जास्त दिसतात. गटबाजी करणाऱ्या कार्यकर्त्याला घरी बसवणार आहे. सोलापूर जिल्ह्याची कार्यकारिणी का बरखास्त केली याचे आत्मचिंतन करा," असा सल्ला उदय सामंतांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.
यावेळी माजी खासदार राहुल शेवाळे, खा. ज्योती वाघमारे, माढा लोकसभा संपर्क प्रमुख चंद्रहार पाटील, माजी आमदार शहाजी पाटील, माजी आमदार जयवंत जगताप, संजय कोकाटे, महेश चिवटे आदी उपस्थित होते.
सावरकर हे हिंदू धर्मभिमानी, त्यांची प्रतिमा वापरून फक्त…; राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना झोडपलं

