तब्बल 40 दिवसांनंतर आखाती देश, युरोपीय देश आणि आशियाई देशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. यातून अमेरिकी लोकांनाही वगळता येणार नाही. अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण युद्धाला अल्पविराम मिळाला आहे.
तशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वेळेप्रमाणे बुधवारी सकाळी ४ वाजता केली आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. हा युद्धविराम दोन आठवड्यांचा असला तरी मधल्या काळात दोन्ही बाजूंनी बैठका होतील आणि तोडगा काढण्याचे प्रयत्न केले जातील. तोपर्यंत होर्मुझ सामुद्रधुनीतून इंधनाची जहाजे मार्गी लागतील आणि आशियाई देशांवर त्यातही मुख्यत्वे भारतावर आलेले गॅस संकट काही दिवसांसाठी टळणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी इराणला निर्वाणीचा इशारा दिला होता. मंगळवारपर्यंत त्यांनी माघार घेतली नाही तर इराण बेचिराख करण्याची धमकी दिली होती. प्रत्यक्षात तशी वेळ आली नाही. कारण मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पडद्यामागे बर्याच घडामोडी घडल्या आणि इराणने दिलेल्या अटी मान्य करत युद्ध दोन आठवड्यांसाठी थांबवण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली. ट्रम्प यांना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही साथ दिल्यामुळे आखाती देशात पुन्हा शांतता नांदेल अशी अपेक्षा बाळगूया! मुळात हे युद्ध का झाले हेही समजून घ्यायला हवे. इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला रोखण्यासाठी आणि इराणच्या लष्करी पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठी अमेरिकेने इस्त्रायलच्या सहकार्याने हे युद्ध केले. इराणला दोन-तीन दिवसांत गुडघ्यावर आणू, असा त्यावेळी ट्रम्प यांचा दावा होता. पण झाले उलटेच आणि इराणनेच अमेरिकेचे प्रचंड नुकसान केले.
अमेरिकेची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाडले, बाजूच्या देशांमधील अमेरिकेचे लष्करी तळ उद्ध्वस्त केले. मुळात युद्धाची गरज नसताना केवळ अहंकारापोटी ट्रम्प यांनी हे युद्ध सुरू केले होते. त्यावेळी युद्ध अमेरिकेने सुरू केले असले तरी शेवट इराण करेल, असे इराणने सुनावले होते. इराणच्या सेनापतींची ही वाणी जवळपास खरी ठरली आहे. कारण ट्रम्प यांच्या या युद्धखोरीमुळे अमेरिकेतील जनता त्यांच्याविरोधात गेली आहे. ट्रम्प यांच्याविरोधात लाखोंच्या संख्येने अमेरिकी लोक रस्त्यावर उतरत आहेत. ही बाब बेदखल करता येणार नाही. त्यामुळे हे थांबवण्यासाठी ट्रम्प यांना निमित्त हवे होते. आता त्यांनी इराणच्या 10 अटी मान्य केल्याचे म्हटले आहे. दुसर्या बाजूला हा युद्धविराम म्हणजे इराणचा मोठा विजय असल्याचे त्यांचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी म्हटले आहे. त्याचवेळी खामेनी यांनी पाकिस्तानचे आभार मानले आहेत. इराणकडून पाकिस्तानचे आभार ही बाब भारतासाठी महत्त्वाची आणि चिंताजनक आहे. कारण इराण हा आपला एकेकाळचा मित्र देश होता. भारत इराणकडून डॉलरऐवजी रुपयांमध्ये तेल विकत घेत होता. मात्र, भारताची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मैत्री सुरू झाल्यानंतर इराणच्या मैत्रीत बाधा आली. तसेच रशियासोबतही झाले. भारत रशियाकडूनही रुपयाच्या मोबदल्यात तेल खरेदी करत होता. मात्र, ट्रम्प यांनी डोळे वटारल्याने आपण रशियाकडून तेल विकत घेणे बंद केले. यांची मोठी आर्थिक किंमत भारताला मोजावी लागली आहे. त्याहीपेक्षा दोन मित्रदेशांना भारताने गमावले आहे, ही बाब लक्षात घ्यावी लागेल.
अमेरिका विरुद्ध इराण युद्धाच्या वेळी इराणने चीन आणि बांगलादेशाची इंधनाची जहाजे थांबवली नव्हती. मात्र, भारताची 24 जहाजे अडकली होती. त्यातील सुरुवातीला दोन, नंतर दोन, अशी जहाजे सोडण्यात आली. म्हणजेच बांगलादेश, चीनला जी वागणूक इराणने युद्धाच्या काळात दिली तशी त्यांनी भारताला दिली नव्हती. याचा अर्थ एकेकाळच्या मित्रदेशाला भारताने गमावल्याचे स्पष्ट झाले आहे. हे युद्ध थांबावे यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ इराण आणि अमेरिका यांच्यात शस्त्रसंधी करण्यासाठी तसेच आखाती देश आणि चीनच्या सहकार्याने दुव्याचे काम करत होते. त्यांच्या मध्यस्थीला यश आले आहे. विशेष म्हणजे आता दोन आठवड्यांसाठी युद्धविराम असला तरी पुढची बैठक पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये होणार आहे. आता प्रश्न आहे या युद्धाने काय साधले? तर हे युद्ध अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अहंकारामुळे सुरू झाले आणि ते अमेरिकेवर जास्त शेकले. युरोपीय देशांनी युद्धासाठी त्यांचे तळ अमेरिकेला वापरू देणार नाही, असे स्पष्ट सांगितले. शिवाय जे युद्ध दोन-तीन दिवसांत संपवू अशा गमजा ट्रम्प मारत होते ते युद्ध 40 दिवस चालले. एवढेच नाही तर त्यामुळे इराण किती शस्त्रसज्ज आहे, हेही दिसले. यामुळे अमेरिकेची पत ट्रम्प यांनी किती तळागाळात नेली, हे जगाला दिसले. या युद्धात किती नुकसान झाले याचा अधिकृत आकडा अजून प्रसिद्ध झालेला नाही. इराण आणि इस्त्रायलमधील किती सैनिक मारले गेले, किती नागरिकांचा मृत्यू झाला, किती इमारती जमीनदोस्त झाल्या, इंधनाचे किती तळ बेचिराख करण्यात आले याचे आकडे हळूहळू बाहेर येतील, तेव्हा सर्वांना वास्तवाची जाणीव होईल. या युद्धातून कुणी काही कमावले नाही आणि काहीही साध्य झाले नाही. असो, आता युद्धाला अल्पविराम मिळाला आहे मात्र, या युद्धाला पूर्णविराम मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे इस्लामाबादमधील बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

