Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Vaibhav Suryavanshi : सूर्यवंशीच्या फलंदाजीचे तुफानी वैभव

Vaibhav Suryavanshi : सूर्यवंशीच्या फलंदाजीचे तुफानी वैभव

ल निनोच्या प्रभावामुळे भारतासह जगभरातील अनेक देशांना सध्या उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागतोय. यावर्षी वातावरणात किमान 2 ते 5 अंश सेल्सिअसची वाढ नोंदवण्यात आली असून उन्हाचा तडाखा सर्वांनाच हैराण करतोय.

अगदी याचप्रमाणे क्रिकेटच्या मैदानातही सूर्यासारखा तळपणारा एक युवा खेळाडू प्रतिस्पर्धी संघांना आपल्या बॅटचा तडाखा देतोय. त्याच्या आक्रमक आणि झंझावाती खेळीने सगळेच प्रतिस्पर्धी संघ हतबल झालेत. या युवा खेळाडूचे नाव आहे वैभव सूर्यवंशी. यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगचा एकोणिसावा अध्याय सूर्यवंशीने धडाकेबाज फलंदाजीने गाजवलाय.

आयपीएलचा सीझन आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचलाय. क्वालिफायरच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सचा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केलाय. तर एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने वैभव सूर्यवंशीच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून क्वालिफायरच्या दुसर्‍या सामन्यात प्रवेश केलाय. क्वालिफायर 2 मध्ये जिंकणारा राजस्थान किंवा गुजरातचा संघ 31 मे रोजी होणार्‍या अंतिम सामन्यात बंगळुरूशी भिडेल. ही तर झाली आयपीएलच्या यंदाच्या सीझनची वाटचाल. या वाटचालीत, किंबहुना संपूर्ण स्पर्धेत, वैभव सूर्यवंशीने आपल्या चमकदार कामगिरीची छाप सोडली आहे. विशेषकरून त्याने हैदराबादविरुद्ध 29 चेंडूत ठोकलेल्या 97 धावांच्या खेळीने सर्वजण मंत्रमुग्ध झालेत. नाही म्हटले तरी या सीझनमध्ये वैभवने याआधी हैदराबादविरुद्ध एक शतक झळकावले असून लखनऊविरुद्ध 93 धावांची खेळीही केली होती. तरी यावेळच्या 97 धावांच्या झंझावाताचा अंदाज वेगळाच होता.

ख्रिस गेलचा सर्वात कमी चेंडूत जलद शतक बनवण्याचा रेकॉर्ड मोडण्यात वैभव अवघ्या 3 धावांनी कमी पडला. परंतु याच सामन्यात त्याने 12 षटकार ठोकून गेलचाच एका आयपीएल सीझनमध्ये सर्वाधिक 59 षटकार मारण्याचा विक्रम आरामात मोडला. वैभवच्या नावे 60 हून अधिक षटकार असून गुजरातविरुद्धच्या सामन्यात त्यामध्ये नक्कीच भर पडेल. शिवाय या सीझनमध्ये सर्वाधिक धावा करणार्‍याला मिळणारी ऑरेंज कॅपही त्याच्याच डोक्यावर आहे. क्रिकेट तज्ज्ञांच्या मते अवघ्या 15 वर्षांचा हा वंडर बॉय क्रिकेटच्या मैदानातला जणू एक चमत्कार आहे. त्याच्यासारखा प्रचंड प्रतिभावान खेळाडू दशकातूनच एकदा जन्माला येतो. गेल्या वर्षीच्या आयपीएल सीझनआधी बीसीसीआयच्या क्रिकेट स्काऊट्सनी वैभवला हुडकून काढले होते. तेव्हा हा साडेतेरा, चौदा वर्षांचा पोरगा त्यांच्यापेक्षा वयाने दुप्पट असलेल्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडत होता. अर्थात ते क्लब लेव्हलचे क्रिकेटही नव्हते.

बिहारसारख्या मागास राज्यातून आलेल्या या अद्भुत युवा प्रतिभेवर राहुल द्रविडसारख्या चाणाक्ष प्रशिक्षकाची नजर पडली. 30 लाख रुपयांच्या बेस प्राईझपासून सुरू झालेल्या आयपीएलच्या बोलीत राजस्थान रॉयल्सने त्याला चक्क 1 कोटी 10 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतले. द्रविडसह राजस्थान संघ व्यवस्थापनाने त्याच्या प्रतिभेला पैलू पाडले. तेव्हापासून हा स्फोटक फलंदाज भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडू लागला. गेल्या आयपीएलमध्ये वैभवने 7 सामने खेळून एक शतक आणि एक अर्धशतक ठोकले तेव्हा तो स्लॉगर अर्थात डोळे बंद करून कशीही आडवी-तिडवी बॅट फिरवणारा खेळाडू असल्याची टीका झाली होती. परंतु गेल्याच वर्षी भारताला अंडर-19 वर्ल्डकप मिळवून देण्यातही वैभवने महत्त्वाची भूमिका बजावली. याचदरम्यान वैभवने प्रथमश्रेणी सामने खेळायला सुरुवात केली आणि तिथेही आपली छाप पाडली. आता तर त्याने आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघांकडून खेळणारे अव्वल दर्जाचे जलदगती आणि फिरकी अशा सर्वच गोलंदाजांची धुलाई करत टीकाकारांचे दात घशात घातले.

वैभवने मैदानात पाऊल टाकताच हायव्होल्टेज ड्रामा सुरू होतो. सामन्याच्या पहिल्या चेंडूपासूनच तो चेंडू तडकावू लागतो. मग तो ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स असो, दक्षिण आफ्रिकेचा कगिसो रबाडा असो किंवा भारताचा जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी अथवा भुवनेश्वर कुमार, या पठ्ठ्याच्या बॅटने कुणालाही दयामाया दाखवलेली नाही. चेंडू आपल्या रेंजमध्ये आला की थेट सीमेपलीकडे गेलाच पाहिजे हा त्याचा माइंडसेट. त्याचे बेफिकिरीचे वय त्याला कुठल्याही दडपणाशिवाय धाडसाने खेळायला प्रवृत्त करते. चेंडूवर रोखलेली बारीक नजर, अचूक टायमिंग, शरीराच्या चपळ हालचाली, तंत्रशुद्ध फूटवर्क आणि विजेच्या गतीने चेंडूवर तुटून पडणारी त्याची बॅट, या सगळ्या कॉम्बिनेशनमुळे वैभव एक स्फोटक फलंदाज ठरतो. सचिनचे क्रिकेटमध्ये पदार्पण झाले तेव्हा तो 16 वर्षांचा होता. सध्या त्याची युवराज सिंगपासून ते शाहिद आफ्रिदीपर्यंत सर्वांचीच तुलना होतेय. वैभवची कारकीर्द किती मोठी असेल? माहीत नाही. क्रिकेटच्या ग्लॅमरस दुनियेत झटपट मिळणारे नेम आणि फेम त्याला सांभाळता येईल की नाही? माहीत नाही. पुढचे पुढे. पण सध्यातरी तो क्रिकेट जगतातल्या प्रत्येक खेळाडूच्या मनात भरलाय. यामागचे कारण म्हणजे मैदानाबाहेरची त्याची वागणूक.

कधी तो मैदानात प्रचंड मेहनत करताना दिसतो, तर कधी धोनी, गावस्कर आदी सिनियर क्रिकेटर्सच्या पाया पडताना दिसतो. याच नम्रपणामुळे सचिनपासून सर्वच खेळाडू त्याचे कौतुक करताना थकत नाहीत. क्रिकेट जगतात आपल्या नावाची अल्पावधीतच हवा बनवणार्‍या वैभवला आता भारतीय क्रिकेट संघाची निळी जर्सी खुणावू लागलीय. भारत पुढच्या दोन-चार महिन्यांत आयर्लंड, इंग्लंड, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजसोबत सामने खेळणार आहे. याचवेळी सप्टेंबरमध्ये एशियन गेम्स होतील. तेव्हा एक ज्युनियर संघ वेस्ट इंडिजला जाईल आणि एक सिनियर संघ एशियन गेम्स खेळेल, असे म्हटले जात आहे. यापैकी कुठल्याही एका संघात वैभवचे पदार्पण निश्चित मानले जात आहे. त्यावेळी वैभवचे वय अवघे साडेपंधरा वर्षांचे असेल. कुणी कितीही म्हणो, वैभव अजून लहान आहे किंवा त्याला अजून अनुभवाची गरज आहे. त्या सर्वांनी एकच गोष्ट लक्षात ठेवायला हवी की वेगाने घोंगावणार्‍या वादळाला जास्त काळ अडवून ठेवता येणार नाही. वैभव सूर्यवंशी नावाचे क्रिकेटच्या जगतातले असेच एक वादळ आहे, जे निळ्या जर्सीत आल्यास प्रतिस्पर्धी संघाची दाणादाण उडवल्याशिवाय राहणार नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar