Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Vidhan Parishad : विधान परिषदेच्या जागांसाठी भाजपमधील नेत्यांकडून लावली जातेय 'फिल्डिंग', कोण-कोण इच्छुक?

Vidhan Parishad : विधान परिषदेच्या जागांसाठी भाजपमधील नेत्यांकडून लावली जातेय 'फिल्डिंग', कोण-कोण इच्छुक?

मुंबई : अलीकडेच राज्यसभेच्या ७ जागांसाठी निवडणूक पार पडली. या सातही जागांसाठी बिनविरोध निवडून आल्या. परंतु, आता विधानपरिषदेमधील ९ आमदारांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपणार आहे. त्यापूर्वी ९ जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे.

त्यापार्श्वभूमीवर उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपमध्ये 'फिल्डिंग' लावण्यासाठी चढाओढ पाहायला मिळत आहे.

विधानपरिषदेतून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजपचे रणजितसिंह मोहिते-पाटील, संजय केणेकर, संदीप जोशी, दादाराव केचे, शिवसेनेच्या ( शिंदे गट ) नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार ) अमोल मिटकरी, काँग्रेसचे राजेश राठोड हे निवृत्त होणार आहेत.

राष्ट्रवादी, शिंदेसेना भाजपात लवकरच विलीन होणार, संजय राऊतांचा दावा; सुनावणीवरही भाष्य

भाजपकडून केशव उपाध्ये, माधवी नाईक, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते यांच्यासह आणखी काहीजण विधानपरिषदेसाठी इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. निवृत्त झालेले मोहिते-पाटील, संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केणेकर यांच्यापैकी कुणाला पुन्हा संधी मिळते की पक्षाकडून नवीन चेहऱ्यांना समोर आणले जाते, हे पाहणे देखील महत्त्वाचे असणार आहे.

विधानपरिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी २८ मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजपचे १३१, शिंदेंच्या शिवसेनेचे ५७, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ४० आणि महाविकास आघाडीचे ४६ आमदार आहेत. त्यानुसार भाजपचे ५, शिंदेंच्या शिवसेनेचे २ आणि राष्ट्रवादीचा एक आमदार निवडून येऊ शकतो. महाविकास आघाडीचा एक आमदार निवडून येईल, एवढे संख्याबळ त्यांच्याकडे आहे. दुसऱ्या जागेसाठी महाविकास आघाडीला १० मतांची आवश्यकता आहे. पण, महायुतीतील आमदार फुटण्याची शक्यता कमीच आहे.

नीलम गोऱ्हेंना पुन्हा संधी मिळू शकते. तर, शिंदेंच्या सेनेकडून आणखी एक आमदार निवडून येऊ शकतो. राष्ट्रवादीकडून अमोल मिटकरींनी पुन्हा संधी मिळते की नवा पत्ता बाहेर काढला जाणार हे देखील पाहावे लागणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे पुन्हा विधानपरिषदेत जाण्यासाठी इच्छुक आहेत.

महाविकास आघाडीकडून राज्यसभेची जागा शरद पवार यांना सोडण्यात आली होती. विधानपरिषदेवर 'आमचा हक्क आहे' असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जात आहे. आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा ठाकरेंच्या नावाला पाठिंबा असणार आहे. मात्र, काँग्रेस काय भूमिका घेते, याकडे सगळ्यांचं लागून राहिलं आहे.

4 मोबाईल, 45 नेते… चाकणकर-खरात कुटुंबाचे आर्थिक लागेबांधे; दोन पतसंस्था चौकशीच्या फेऱ्यात

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar