नवी दिल्ली : तामिळनाडू राज्यात विधानसभा निकालांमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. मतदान झाल्यानंतर आलेल्या अनेक पोलनुसार, तामिळनाडूमध्ये पुन्हा एकदा द्रविड मुन्नेत्र कळघम म्हणजेच डीएमकेची सत्ता येईल, अशी चर्चा रंगली होती.
तर, अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम म्हणजेच एआयडीएमके हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरेल असे अशी चर्चा होती. कारण 23 एप्रिल 2026 रोजी झालेल्या मतदानात विक्रमी 85.1 टक्के मतदान झाले होते. पण, सोमवारी (4 मे) झालेल्या मतमोजणीमध्ये धक्कादायक निकाल पहिल्या 4 तासांत समोर आला.
अभिनेते विजय ठरले किंग
सोमवारी (4 मे) सकाळी 8 वाजता सुरु झालेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये धक्कादायक निकाल समोर आले. सुरुवातीला डीएमकेने चांगली सुरुवात केली. पण, दुपारी 12 पर्यंत अवघ्या 2 वर्षांपूर्वी पक्ष स्थापन केलेल्या सुपरस्टार अभिनेते थलपती विजयच्या तमिळघा वेट्री कझगम म्हणजेच टीव्हीकेला मोठी पसंती दिल्याचे समोर आले आहे. त्यांच्या टीव्हीकेने पहिल्या काही कलांनुसार, जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून आले. निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटनुसार, सकाळी 11.30 पर्यंत टीव्हीकेने तब्बल 111 जागांवर आघाडी घेतल्याचे समोर आले. तर, एआयडीएमके हा दुसऱ्या क्रमाकांचा पक्ष ठरला. त्यांनी 60 जागांवर आघाडी घेतली तर सत्ताधारी डीएमकेने 41 जागांवर आघाडी घेतल्याचे समोर आले. त्यामुळे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या डीएमकेवर नवख्या टीव्हीकेने मात केल्याचे समोर आले.
भाजपची ऑफर काय?
तामिळनाडूमध्ये आता हालचाली सुरु झाल्या असून भाजपकडून विजय यांच्या टीव्हीकेला मोठी ऑफर दिली आहे. एका माध्यमाला प्रतिक्रिया देताना तामिळनाडू भाजपाच्या उपाध्यक्ष खुशबू सुंदर म्हणाल्या की, एआयडीएमकेच्या नेतृत्त्वात आघाडी बहुमताच्या जवळ पोहोचल्यास विजय यांना एनडीएमध्ये सहभागी होण्यासाठी पक्षाचे दरवाजे खुले असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. याचा निर्णय माझ्या भावालाच (अभिनेते विजय) घ्यावा लागेल, की त्याला आमच्यासोबत यायचे आहे की नाही. त्याची बहीण म्हणून माझ्या मनात त्याच्याबद्दल अत्यंत आदर आणि स्नेह आहे. माझ्या धाकट्या भावासोबत माझ्या सदैव शुभेच्छा आहेत, पण माझी निष्ठा मात्र माझ्या पक्षाशी आहे." असे म्हणत त्यांनी युतीचे संकेत दिले आहेत.
"आम्ही विजय यांच्या विरोधात कधीच काही बोललो नाही. एनडीएचा भाग व्हायचे की नाही, हे ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे त्यांचा आहे. त्यांनी आपल्या पक्षाला विश्वासात घेणे गरजेचे आहे. विजय यांच्यासाठी आमची दारे नेहमीच उघडी आहेत. जर त्यांना आमच्यासोबत यायचे असेल, तर त्यांचे स्वागत करण्यास आम्हाला मनापासून आनंदच होईल. हा निर्णय त्यांनाच घ्यावा लागेल." असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे आता अंतिम निकाल कसा लागतो? आणि विजय यांच्या टीव्हीकेला सर्वाधिक मते मिळाली की ते सत्ता स्थापन करतात? की एनडीएसोबत जात कोणता निर्णय घेतात? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

