वसई : विरार पूर्वेतील बरफपाडा स्मशानभूमीच्या मागील जंगल परिसरात सुरू असलेल्या गावठी दारू निर्मितीच्या हातभट्टीवर अंमली पदार्थ विरोधी कक्ष-2 च्या पथकाने कारवाई करत मोठ्या प्रमाणात वॉश, तयार दारू आणि दारू निर्मितीचे साहित्य जप्त करून नष्ट केले.
या प्रकरणी एका महिलेविरुद्ध विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
29 मे रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्ष-2 चे पथक गस्त घालत असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार विरार पूर्वेतील बरफपाडा येथील स्मशानभूमीच्या मागील बाजूस असलेल्या जंगल परिसरात छापा टाकण्यात आला. यावेळी झाडाझुडपांमध्ये उभारण्यात आलेली गावठी दारू तयार करण्याची हातभट्टी पोलिसांना आढळून आली.
तपासादरम्यान कुंता चिपाट ही महिला या हातभट्टीच्या माध्यमातून गावठी दारू तयार करत असल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळी लोखंडी ड्रममध्ये सुमारे दोन हजार लिटर वॉश (दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे रसायन) साठवून ठेवण्यात आले होते. तसेच अंदाजे 90 लिटर तयार गावठी दारू कॅनमध्ये भरून ठेवलेली आढळून आली.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करून संपूर्ण हातभट्टी उद्ध्वस्त केली. दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे वॉश, तयार दारू तसेच अन्य साहित्य असा एकूण 1 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रकटीकरण) मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्ष-2 चे प्रभारी पोलीस निरीक्षक ऋषिकेश पवळ यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

