- उत्तम जोगदंड
नाशिक येथील विकृत भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण उजेडात आल्यानंतर एकापाठोपाठ एक असे अनेक भोंदूबाबा पकडले गेले. विविध माध्यमांमधून त्यावर विचार-मंथन घडू लागले. या पार्श्वभूमीवर 'विवेक जागर प्रकाशन'ने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी (महा.
अंनिस) दिनांक ५ मे २०२६ रोजी एकाच वेळी 'उदंड झाले भोंदू', 'मनःस्वास्थ्य आणि आपण', 'चार्वाक कोण होते?' ही तीन पुस्तके प्रकाशित केली आहेत. वर्तमानकाळातली वाढती बुवाबाजी, लोकांची मानसिक अवस्था आणि विवेकी विचार या तीनही बाबींची सांगड घालणारी ही पुस्तके आहेत.
उदंड झाले भोंदू
बुवाबाजी आणि जातपंचायतींच्या शोषणाविरोधात लढा देणारे कृष्णा चांदगुडे यांनी संपादित केलेल्या या पुस्तिकेत बुवाबाजीचा, भोंदुगिरीचा विविध अंगांनी वेध घेणारे नऊ वाचनीय लेख आहेत. प्रस्तावनेत संजय बनसोडे यांनी सांगितल्याप्रमाणे या पुस्तकातील मांडणी कोणत्याही व्यक्तिविरोधात नाही, कारण बुवाबाजी हा काही केवळ एखाद्या व्यक्तीचा किंवा व्यक्तिसमूहाचा प्रश्न नसून ती एका मोठ्या सामाजिक, मानसिक, आर्थिक आणि राजकीय व्यवस्थेची निर्मिती आहे. पुस्तकाचे संपादक चांदगुडे यांचाही लेख या पुस्तकात असून त्यांनी अशोक खरात प्रकरणातील बारकावे दाखवून दिले आहेत. तसेच महा. अंनिसने त्याच्या विरोधात कित्येक वर्षांपूर्वीच सुरू केलेल्या संघर्षाची माहिती दिली आहे. प्रसिद्ध मानसतज्ज्ञ डॉ. रूपेश पाटकर यांच्या 'तो' असा कसा वागू शकतो, या लेखात त्यांनी मानवी स्वभावातील मनोवृत्तीच्या P-A-C (Parent-Adult-Child) या घटकांची माहिती देऊन मानसशास्त्रीय अंगाने मीमांसा केली आहे.
आपलं महानगरचे निवासी संपादक हेमंत भोसले यांनी 'कसली दैवीशक्ती; महिलांना जाळ्यात अडकवणारे मानसशास्त्रच' या लेखात भोंदूबाबांमध्ये फसवणुकीसाठी आत्मविश्वास येण्यामागे कसलीही दैवी शक्ति नसून, त्यांचे फसवणूक करण्याचे कौशल्य उजेडात आणले आहे. शहाजी भोसले हे भोंदू बुवांशी थेट भिडून काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यांनी 'चमत्कार आणि बुवाबाजी या लेखात 'बुवाबाजी' ही केवळ अंधश्रद्धा नसून विवेकबुद्धीवर आघात करणारी एक प्रकारची फसवणूक असल्याचे मत मांडले आहे. 'विवेक शाबूत तरच भोंदुगिरी काबूत…' या डॉ. ठकसेन गोराणे यांच्या लेखात भोंदुगिरीचे विश्लेषण करताना समस्या सोडवण्याचे वैज्ञानिक, नैतिक मार्ग सोडून भलतेच काहीतरी सांगणारा आणि पीडित व्यक्तींचे सर्व मार्गाने शोषण करणारी व्यक्ति म्हणजे भोंदूबुवा, अशी व्याख्या केली आहे. स्त्रिया या अंधश्रद्धेच्या वाहक असतात असे नेहमी म्हटले जात असले तरी 'पुरुषही बुवाबाजीचे बळी' कसे होतात याची सोदाहरण माहिती याच शीर्षकाच्या लेखात उत्तम जोगदंड यांनी दिली आहे. 'आमचे बापू तसे नाहीत' या लेखात असा गैरसमज करून घेणार्या लोकांच्या डोळ्यावरील झापडे विज्ञान लेखक डॉ. नितीन हांडे यांनी दूर केली आहेत.
मनःस्वास्थ्य आणि आपण
विज्ञान, तंत्रज्ञानातील प्रगती, बदलती राजकीय-सामाजिक परिस्थिती, यामुळे समाजामध्ये नवनवीन मानसिक समस्या निर्माण होताना दिसत आहेत. त्यांचा वेध 'मन:स्वास्थ्य आणि आपण' या राजेंद्र फेगडे संपादित पुस्तिकेतील ११ लेखांमधून घेण्यात आला आहे. सामाजिक संबंधांचे महत्त्व ही या पुस्तिकेची थीम आहे. प्रस्तावनेत प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रदीप पाटकर यांनी मानसिक आरोग्याविषयी ऊहापोह करून या पुस्तिकेतील लेख हे मानवी मनावरील आजूबाजूच्या वास्तवाच्या प्रभावाविषयी आपल्याशी संवाद साधू इच्छितात असे म्हटले आहे.
या पुस्तिकेतील सर्व लेख आपल्या सर्वांच्या जीवनात नेहमी येणार्या समस्यांवर शास्त्रीय माहिती देतात. 'मानसिक आरोग्याची संजीवनी' (डॉ. अंजली जोशी) या लेखात विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र (आरईबीटी) आणि 'सं-जी-व-नी' हे सूत्र यामार्फत तणाव कसा हाताळावा यावर विवेचन केले आहे. स्वमग्नता, ऑटिझम, इत्यादी मुलांमधील मानसिक आजारावर 'मानसिक दिव्यांग मुलांचे शिक्षण व पुनर्वसन: सद्य:स्थिती' या लेखात डॉ. शाश्वत शेरे आणि शमिन शेरे यांनी, समाजाने या मुलांना केवळ सहानुभूती आणि दयेची वागणूक न देता समाजाचा एक घटक समजून आपल्यात सामावून घेतले पाहिजे, अशी रास्त अपेक्षा व्यक्त केली आहे. प्रसिद्ध लेखक, आयटी तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी नैराश्य (डिप्रेशन) ही सर्वत्र आढळून येणारी मानसिक समस्या आणि एआयची याबाबतीत होणारी मदत, त्यातील फायदे-तोटे यावर उद्बोधक विवेचन केले आहे. 'समाजमाध्यमे आणि मानसिक स्वास्थ्य' या लेखात डॉ. प्रदीप जोशी यांनी समाजमाध्यमांचे फायदे, तोटे आणि त्यातून समाजाला भेडसावणार्या समस्या यावर माहिती दिली आहे.
गेल्या काही वर्षांत धार्मिक सलोखा बिघडल्याने अल्पसंख्याक समुदायाचे झुंडबळी घेतले गेले. डॉ. प्रदीप पाटकर यांनी 'झुंडीची मानसिकता' या लेखात या विषयावर विचार मांडून नागरिक म्हणून आपण काय करू शकतो, यावर मार्गदर्शन केले आहे. 'खाउजा' धोरणांनंतर देशात वाढू लागलेल्या चंगळवादावर 'चंगळवादाचे मानसशास्त्र' हा डॉ. रूपेश पाटकर यांचा लेख आहे. महाराष्ट्राला भेडसावणार्या शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावर 'शेतकर्यांच्या आत्महत्या समजून घेताना' हा डॉ. मिलिंद पोतदार यांचा लेख प्रकाश टाकतो. मनोविकारग्रस्तांच्या विवाहावर 'मनोविकार आणि विवाह' हा डॉ. अनिल डोंगरे यांचा महत्त्वपूर्ण लेख आहे. 'मनोरुग्णांच्या उपचारातील आणि पुनर्वसनातील अडचणी व उपाय' मनोरुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी (caregiver) मार्गदर्शक आहे.
चार्वाक कोण होते?
'चार्वाक' हा काय प्रकार आहे हे बर्याच लोकांना माहिती नसते किंवा चार्वाक म्हणजे 'नास्तिक' एवढेच माहिती असते. याचे कारण चार्वाक विषयावर पुरेसे साहित्य उपलब्ध नाही. त्यांचा भारतीय परंपरेत आढळणारा उल्लेख तत्कालीन विरोधकांच्या लेखनातून, टीकात्मक संदर्भात किंवा उपहासात्मक स्वरुपात येतो, असे लेखक आपल्या मनोगतात सांगतात. अशी उपलब्ध असलेली माहिती संकलित करून आणि त्या माहितीची संगती लावून 'चार्वाक कोण होते?' या पुस्तिकेत प्रसिद्ध विवेकवादी आणि विज्ञानवादी लेखक जगदीश काबरे यांनी चार्वाकांचा लेखाजोखा मांडला आहे. 'चार्वाकांचा उदय' या प्रकरणात उदयाच्या कालावधीचा शोध घेताना लेखकांनी वैदिक काळापासून ते बौद्ध आणि जैन आदी विविध दर्शनांचा कालावधी, त्या दर्शनांमध्ये आलेले चार्वाकांचे उल्लेख यांचा आधार घेऊन अभ्यासपूर्ण आणि तर्कशुद्ध विवेचन केले आहे. नंतरच्या प्रकरणांमध्ये चार्वाक किंवा लोकायत म्हणजे नक्की कोण होते, त्यांची देव, आत्मा, पुनर्जन्म, स्वर्ग, मोक्ष याबाबतची भूमिका काय होती यावर सविस्तर विवेचन केले आहे.
बौद्ध आणि जैन दर्शनाप्रमाणे वैदिक संस्कृतीला विरोध करणारे हे चार्वाक दर्शन असल्याने वैदिकांकडून त्यास तीव्र विरोध होणे साहजिकच होते. या तीव्र किंवा हिंसक विरोधामुळे चार्वाक दर्शन कसे दडपले गेले याचे विश्लेषण लेखकांनी केले आहे. चार्वाकांना तत्कालीन प्रस्थापितांकडून आणि नंतरही विरोध होत असतानासुद्धा काही प्रमाणात का होईना ते वेगवेगळ्या काळात अस्तित्व दाखवत राहिले, याची माहिती या पुस्तकात येते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या संघटना वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार-प्रसार करताना आणि अंधश्रद्धा निर्मूलन करताना 'जेवढा पुरावा, तेवढा विश्वास' हे वैज्ञानिक दृष्टिकोनाचे सूत्र वापरतात. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणारा विवेकी समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात. हे चार्वाक दर्शनासोबत जाणारे कसे आहे, याची मांडणी लेखक शेवटच्या प्रकरणात करतात. चार्वाकांवर अभ्यासपूर्ण माहिती देणारे हे पुस्तक संदर्भग्रंथ म्हणून आणि संग्रही ठेवण्यासारखे आहे.
(लेखक सामाजिक विषयांचे अभ्यासक आहेत.)

