Monday, 28 Oct, 5.42 am My महानगर

क्रीडा
वॉर्नरचा शतकी झंझावात

'बर्थडे-बॉय' डेविड वॉर्नरने केलेल्या झंझावाती शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा १३४ धावांनी धुव्वा उडवला. दीड वर्षांहूनही अधिक काळानंतर ऑस्ट्रेलियामध्ये आंतरराष्ट्रीय सामना खेळणार्‍या वॉर्नरने ५६ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद १०० धावांची खेळी केली. हे त्याचे आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील पहिलेवहिले शतक होते.

अ‍ॅडलेड येथे झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर वॉर्नर आणि कर्णधार अ‍ॅरॉन फिंच यांनी अप्रतिम फलंदाजी करत पहिल्या विकेटसाठी १२२ धावांची भागीदारी केली. फिंचने ३१ चेंडूत, तर वॉर्नरने २८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. फिंचला ६४ धावांवर लक्षण संदाकनने बाद करत ही जोडी फोडली. यानंतर फलंदाजीला आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने आक्रमक फलंदाजी करत अवघ्या २८ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. तसेच त्याने वॉर्नरसह दुसर्‍या विकेटसाठी १०७ धावा जोडल्या. वॉर्नरने ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या अखेरच्या चेंडूवर एक धाव काढत आपले शतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाने २० षटकांत २ बाद २३३ अशी धावसंख्या उभारली. श्रीलंकेच्या कसून रजिथने आपल्या ४ षटकांत ७५ धावा खर्ची केल्या.

२३४ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने सुरुवातीपासूनच ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. त्यांच्या एकाही फलंदाजाला २० धावांचा टप्पा पार करता आला नाही. त्यामुळे श्रीलंकेने २० षटकांत ९ विकेट्स गमावत केवळ ९९ धावा केल्या. त्यांच्याकडून दासून शनाकाने सर्वाधिक १७ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक - ऑस्ट्रेलिया : २० षटकांत २ बाद २३३ (वॉर्नर नाबाद १००, फिंच ६४, मॅक्सवेल ६२; शनाका १/१०) विजयी वि. श्रीलंका : २० षटकांत ९ बाद ९९ (शनाका १७; झॅम्पा ३/१४, स्टार्क २/१८).

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top