Saturday, 14 Dec, 3.33 pm My महानगर

होम
.यालाच म्हणतात का अच्छे दिन?; सोनिया गांधींचा मोदींना टोला

देशाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. देशाच्या प्रदीर्घ काळापासून परिस्थिती गंभीर झाल्याने आपण सर्वजण येथे आलो आहोत. तुम्ही बदलासाठी तयार आहात का? आज जी शेतकऱ्यांची परिस्थिती पाहत आहे, ती पाहून फार वाईट वाटत आहे. त्यांना वेळेत बियाणे मिळत नाही, त्यांना सहज खत मिळत नाही. पिकांना वाजवी किंमत नाही. तसेच मोदी सरकारचा कारभार म्हणजे अंधेरी नगरी चौपट राजा, असा आहे अशी घणाघाती टीका काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. दिल्लीतल्या रामलीला मैदानावर झालेल्या देश बचाओ रॅलीमध्ये त्यांनी ही टीका केली. 'सबका साथ सबका विकास' ही घोषणा मोदी सरकारने दिली होती. मात्र, आज मी विचारते आहे की कुठे आहे सबका साथ सबका विकास? काही ठराविक लोकांचे खिसे भरले जात असून जनतेचा, शेतकऱ्यांचा, बेरोजगारांचा या सरकारला पूर्णपणे विसर पडला आहे अशीही टीका सोनिया गांधी यांनी केली.

काय म्हणाल्या सोनिया गांधी?

'काळा पैसा रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका रात्रीत निर्णय घेतला. मात्र, आज मी तुम्हाला सवाल करते की, तो काळा पैसा आहे कुठे आहे? आज देशात बेरोजगारी वाढली आहे. मोठ्या प्रमाणात लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. त्याचप्रमाणे आर्थिक मंदीचे सावट देखील आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अनेक छोटे व्यावसायिक उद्धवस्त झाले आहेत. त्यांना कोणतीही बँक कर्ज देण्यास तयार नाही. त्यामुळे त्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. देशात भीतीचे वातावरण आहे. मग यालाच म्हणतात का अच्छे दिन', असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.


Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top