Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भांडूपमध्ये रस्ता आणि फूटपाथ खचला, झाडेही उन्मळून पडली

भांडूपमध्ये रस्ता आणि फूटपाथ खचला, झाडेही उन्मळून पडली

मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या तुफान पावसामुळे ठिकठिकाणी दुर्घटना घडत आहेत. माटुंगा आणि दादरमध्ये झाडे पडल्याच्या घटना ताज्या असतानाच, आज (शनिवारी) दुपारी भांडूपमध्ये एक मोठी आणि धक्कादायक दुर्घटना घडली.

भांडूप पश्चिमेकडील एलबीएस मार्गावर एशियन पेंट्सच्या समोर 100 बाय 100 फूट लांबीचा भलामोठा रस्ता आणि फूटपाथ अचानक खचला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र एका वाहनाचे नुकसान झाले आहे.

भांडूपमधील सोनापूर परिसरात एलबीएस मार्गालगत एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. यासाठी खूप खोलवर खड्डा खोदण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून आणि काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे, विकासकाने खोदलेल्या खड्ड्याशेजारील जमीन ओली होऊन ठिसूळ झाली. त्यामुळे शनिवारी दुपारी 1:25च्या सुमारास रस्त्याशेजारील फूटपाथ आणि रस्ता थेट खड्ड्यात कोसळला.
रस्ता खचतानाचा प्रसंग स्थानिकांनी कॅमेऱ्यात कैद केला आहे. रस्ता खचल्यामुळे तिथे असलेले एक मोठे झाड, बांधकाम साइटला लावलेले पत्रे आणि बस स्टॉपचा भागही थेट पाण्यात कोसळताना व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. तसेच रस्त्याखालील अंतर्गत वायरींगही उघडे पडून नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई पोलीस आणि महानगरपालिकेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. संभाव्य धोका टाळण्यासाठी एलबीएस मार्गावरील या भागातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. उर्वरित रस्ताही खचण्याची शक्यता असल्याने, पोलिसांनी या संपूर्ण परिसराला बॅरिकेडिंग करून नागरिकांना तिथे जाण्यास मज्जाव केला आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, विकासकाने सुरक्षिततेचे योग्य उपाय न योजता अतिशय खोल खड्डा खोदला होता. तसेच, गटार सफाईच्या कामातही कंत्राटदाराने हलगर्जीपणा केल्याने पाण्याचा निचरा योग्य प्रकारे झाला नाही, ज्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

सध्या मुंबईत जोरदार पाऊस सुरू असून पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Marathi