Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गुरुपौर्णिमेनिमित्त रंगला कलावर्धिनीचा 'अनुग्रह' भरतनाट्यम् नृत्याविष्कार!

गुरुपौर्णिमेनिमित्त रंगला कलावर्धिनीचा 'अनुग्रह' भरतनाट्यम् नृत्याविष्कार!

डॉ.सुचेता भिडे-चाफेकर यांच्यासह ५० हून अधिक कलाकारांचे मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण

पुणे :

गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि कलावर्धिनी डान्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 'अनुग्रह' या विशेष भरतनाट्यम् नृत्याविष्काराला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यशवंतराव चव्हाण नाट्यगृह,कोथरूड येथे दि.२९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमात भारतीय शास्त्रीय नृत्यपरंपरा,गुरू-शिष्य नाते आणि भक्तिरस यांचा अप्रतिम संगम अनुभवायला मिळाला.

कर्नाटक संगीत परंपरेतील महान संत-संगीतकार आणि कर्नाटक संगीत त्रिमूर्तींपैकी एक असलेल्या श्री मुथुस्वामी दीक्षितार यांच्या २५० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या निवडक रचनांवर आधारित भरतनाट्यम् सादर करून त्यांना अभिवादन करण्यात आले.त्यांच्या संगीत,काव्य,तात्त्विक विचार आणि भक्तिभावाचे प्रभावी दर्शन नृत्याविष्कारातून घडले.ज्येष्ठ भरतनाट्यम् गुरू डॉ.सुचेता भिडे-चाफेकर यांच्या नृत्य सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.तसेच कलावर्धिनी डान्स कंपनीच्या ५० हून अधिक नृत्यांगना, प्रशिक्षक आणि विविध पिढ्यांतील शिष्यांनी एकत्रित सादर केलेल्या भव्य समूहनृत्याने कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त करून दिली.अरुंधती पटवर्धन यांनी स्वागत केले.हा कार्यक्रम विनामूल्य होता.

यावेळी बोलताना ज्येष्ठ भरतनाट्यम् गुरू डॉ.सुचेता भिडे-चाफेकर म्हणाल्या,'भारतीय संस्कृतीत गुरू हे केवळ ज्ञान देणारे नसून व्यक्तिमत्त्व घडविणारे, साधनेला दिशा देणारे आणि कलेतील मूल्यांची जपणूक करणारे दीपस्तंभ आहेत.गुरुपौर्णिमा हा आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. 'अनुग्रह' या नृत्याविष्कारातून आम्ही गुरू-शिष्य परंपरेचे पावित्र्य,मुथुस्वामी दीक्षितार यांच्या अद्वितीय संगीत वारशाला अभिवादन आणि भारतीय शास्त्रीय कलेची अखंड परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे.विविध पिढ्यांतील शिष्यांना एकाच मंचावर सादरीकरणाची संधी मिळणे, हीच आमच्यासाठी गुरूंच्या अनुग्रहाची खरी अनुभूती आहे.'

'अनुग्रह' हा केवळ भरतनाट्यम् नृत्याविष्कार न ठरता गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा,भारतीय गुरू-शिष्य परंपरेचा गौरव करणारा आणि अध्यात्म,साधना व कलात्मक उत्कृष्टतेचा उत्सव ठरला.विविध पिढ्यांतील शिष्यांनी आपल्या गुरूंना नृत्यरूपाने अर्पण केलेली आदरांजली उपस्थित रसिकांच्या मनाला स्पर्शून गेली.कार्यक्रमाला कला,संस्कृती आणि शास्त्रीय नृत्य क्षेत्रातील मान्यवरांसह मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Marathi