Tuesday, 22 Sep, 11.23 am माय मराठी

बातम्या
ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन, मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती कोरोनाची लागण

सातारा-ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन झाले. सातारा येथील फलटण तालुक्यात 'आई माझी काळूबाई' या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती. प्रकृती बिघडल्यानंतर आशालता यांना 16 सप्टेंबर रोजी वाई येथील प्रतिभा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आशालता वाबगावकर यांची ऑक्सिजन लेव्हल कमी जास्त होत होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर पहाटे 4.30 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. वाबगावकर यांच्या निधनाने मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

साताऱ्याजवळ असलेल्या वाई जवळच्या हिंगोली या गावात एका फार्म हाऊसमध्ये या मालिकेचे शुटिंग सुरू होे. आशालता या गेली काही दिवस या शुटिंगसाठी तिथेच होत्या. या मालिकेत एका गाण्याचे शुटिंग सुरू होते. तिथे मुंबईवरून काही कलाकारांचा ग्रुप आला होता. त्याच वेळी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असावा अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

आशालता वाबगांवकर यांचा जन्म 31 मे 1941 रोजी गोव्यात झाला. त्या मुळच्या गोव्याच्या असल्याने त्यांनी कोंकणी आणि मराठी नाटकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. आशालता वाबगांवकर यांनी आतापर्यंत जवळपास 100 हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केले आहे. अपने पराये या हिंदी चित्रपटातून त्यांनी सिने सृष्टीत पदार्पण केले. तर रायगडाला जेव्हा जाग येते हे त्यांचे पहिले नाटक होते.

गुंतता हृदय हे, वाऱ्यावरची वरात, चिना, मोहनंदा यासारख्या अनेक नाटकात त्यांनी काम केले. तसेच उंबरठा, सुत्रधार, नवरी मिळे नवऱ्याला, वहिनीची माया हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट होते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Marathi
Top