Dailyhunt
काँग्रेसचा अंबादास दानवेंना पाठिंबा- हर्षवर्धन सपकाळांची घोषणा.. विधान परिषदेच्या उमेदवारांची संपूर्ण यादी पहा

काँग्रेसचा अंबादास दानवेंना पाठिंबा- हर्षवर्धन सपकाळांची घोषणा.. विधान परिषदेच्या उमेदवारांची संपूर्ण यादी पहा

मुंबई-विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला सत्तासंघर्ष आणि नाराजीनाट्य अखेर संपुष्टात आले आहे. काँग्रेसने आपला स्वतंत्र उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला असून, शिवसेना ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांच्या उमेदवारीला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे.

आज पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही अधिकृत घोषणा केली.

सकाळपर्यंत काँग्रेस स्वतंत्र उमेदवार देणार अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र, दुपारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत हर्षवर्धन सपकाळ आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवर संवाद झाला. बैठकीतील या चर्चेनंतर आपण विधान परिषद निवडणुकीत उमेदवार देणार नसल्याचे काँग्रेसने सांगितले.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, 'आताच्या निवडणुकीत काँग्रेस आणि इतर पक्षांची भूमिका होती की, महाविकास आघाडीचा चेहर म्हणून उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावे. आमची अशी धारणा असताना मी विधान परिषदेवर जाणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. अंबादास दानवेंना उमदेवारी देत असताना एक प्रक्रिया होणे आवश्यक होते, असे आमचे मत आहे. आमच्यात कोणते भांडण किंवा वाद नव्हता. ठाकरे गटाने घेतलेला निर्णय हा महाविकास आघाडीचा निर्णय म्हणून काँग्रेस पक्ष त्याचे समर्थन करतो.'हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, 'आमच्या तिन्ही पक्षांमधील घडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी काय आहे, कशी आहे? अशा प्रकारच्या होणाऱ्या चर्चा निरर्थक आहे. येणाऱ्या सर्व निवडणुका किंवा राजकीय भूमिका तिन्ही पक्ष एकत्रितरित्या रणनिती ठरवतील. त्यामुळे यापुढे आम्ही सोबत राहू. पुढील येणाऱ्या विधान परिषद आणि राज्य सभेच्या ज्या जागा असतील, त्यातही आमची आघाडी राहील. आमची ठाकरे गटासोबत दीर्घ चर्चा झाली.'

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, 'पुढील २०२८ आणि २०२९ विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष प्राध्यान्याने प्रतिनिधित्व करेल. अशी आमची तिन्ही मित्र पक्षांची चर्चा झाली. या निवडणुकीत काँग्रसचा पाठिंबा अंबादास दानवे यांना उमेदवार म्हणून राहील.'

उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजीचे सूर होते. त्यानंतर आज महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसची मनधरणी करण्यात ठाकरे गटाला यश आले. त्यामुळे आता काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे दानवे यांचा विजय सुकर मानला जात आहे.

विधान परिषदेच्या उमेदवारांची संपूर्ण यादी

भाजप

  1. सुनील कर्जतकर
  2. माधवी नाईक
  3. संजय भेंडे
  4. विवेक कोल्हे
  5. प्रमोद जठार
  6. प्रज्ञा सातव (पोटनिवडणूक)

शिवसेना (शिंदे गट):

  1. नीलम गोऱ्हे
  2. बच्चू कडू

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट):

  1. झिशान सिद्दीकी

मविआ:शिवसेना उद्धव ठाकरे गट:

  1. अंबादास दानवे
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Marathi