Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लाज शरम वाटू द्या, त्या नालायकांना माफी मागायला लावा किंवा पदावरून हटवा अन्यथा मोठे आंदोलन - संजय काकडे

लाज शरम वाटू द्या, त्या नालायकांना माफी मागायला लावा किंवा पदावरून हटवा अन्यथा मोठे आंदोलन - संजय काकडे

'गुंगी गुडिया' टिप्पणीवर संजय काकडे आक्रमक; सपकाळांच्या राजीनाम्याची मागणी

राहुल गांधींनी तातडीने कारवाई करावी; शरद पवारांनी काँग्रेसपासून दूर व्हावे, माजी खासदारांचे आवाहन

पुणे : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसच्या सोशल मीडिया खात्यावरून करण्यात आलेल्या 'गुंगी गुडिया' या उल्लेखावरून माजी खासदार संजय काकडे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

सपकाळ यांनी संबंधित शब्दप्रयोगाचे समर्थन करणे अधिक गंभीर असल्याचे सांगत, काँग्रेसने त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी आणि सुनेत्रा पवार यांची माफी मागावी, अशी मागणी काकडे यांनी पत्रकार परिषदेत केली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन हर्षवर्धन सपकाळ यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांना जाहीर माफी मागण्याचे आदेश द्यावेत, असे काकडे म्हणाले. काँग्रेसकडून कारवाई न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

महिलांचा अपमान महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारा

सुनेत्रा पवार यांच्याविषयी वापरण्यात आलेली भाषा महिलांचा अपमान करणारी असून, महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक संस्कृतीला ती शोभणारी नाही, असे काकडे यांनी सांगितले. राजकीय मतभेद असले तरी एखाद्या महिला नेत्याविषयी अशा प्रकारचे शब्द वापरणे योग्य ठरत नाही. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी हा शब्दप्रयोग मागे घेण्याऐवजी त्याचे समर्थन केल्याने काँग्रेसची महिला सन्मानाबाबतची भूमिका उघड झाली आहे, असा आरोप त्यांनी केला.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्चात सुनेत्रा पवार मोठ्या जबाबदारीला सामोरे जात असताना त्यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका करणे असंवेदनशील असल्याचेही काकडे म्हणाले. विरोधकांनी त्यांच्या कामावर, निर्णयांवर आणि धोरणांवर प्रश्न उपस्थित करावेत; मात्र महिलांचा अवमान करणारी भाषा स्वीकारली जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

शरद पवारांनी काँग्रेसबाबत भूमिका स्पष्ट करावी

या वादाच्या पार्श्वभूमीवर संजय काकडे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही काँग्रेसबाबत ठोस भूमिका घेण्याचे आवाहन केले. आपल्या कुटुंबातील सुनेविषयी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशा पद्धतीने बोलत असतील, तर शरद पवार यांनी काँग्रेसपासून दूर जाण्याचा विचार करावा, असे ते म्हणाले.

आज सुनेत्रा पवार यांच्याबाबत अशा प्रकारची भाषा वापरण्यात आली आहे; भविष्यात खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयीही अशीच भाषा वापरली जाऊ शकते, अशी भीती काकडे यांनी व्यक्त केली. काँग्रेसने माफी मागितली नाही किंवा सपकाळ यांच्यावर कारवाई केली नाही, तर शरद पवार यांनी महाविकास आघाडीतील संबंधांचा पुनर्विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

काँग्रेसला २४ तासांचा इशारा

काँग्रेसने संबंधित विधान मागे घेत सुनेत्रा पवार यांची माफी मागावी, यासाठी २४ तासांची मुदत देत असल्याचे काकडे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. अन्यथा काँग्रेसच्या कार्यक्रमांसमोर निदर्शने करण्यात येतील आणि पक्षाच्या नेत्यांना तीव्र विरोधाला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरील पोस्ट आणि त्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे हा वाद अधिक चिघळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह विविध पक्षांच्या नेत्यांनीही संबंधित शब्दप्रयोगाचा निषेध करून काँग्रेसकडे माफीची मागणी केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Marathi