Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
महाराष्ट्राचा गृहविभाग 'पांडू हवालदार' चालवतो म्हणूनच राज्यात अवैध धंदे, ड्रग्ज, विषारी दारुचे थैमान: हर्षवर्धन सपकाळ

महाराष्ट्राचा गृहविभाग 'पांडू हवालदार' चालवतो म्हणूनच राज्यात अवैध धंदे, ड्रग्ज, विषारी दारुचे थैमान: हर्षवर्धन सपकाळ

राज्यातील कायदा सुव्यवस्थेची बिघडलेली स्थिती पाहता देवेंद्र फडणविसांनी प्रायश्चित घ्यावे; पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा.

मुंबई, दि. ३० मे २०२६..

महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली असून खालच्या स्तरापासून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत हप्ते पोहचवले जात आहेत.

हप्ता वसुलीमुळे पोलीस प्रशासनावर कोणाचाही वचक राहिलेला नाही म्हणूनच राज्यात ड्रग्जचा खुलेआम काळाधंदा सुरु आहे, गांजा विकला जातो, हातभट्ट्या व विषारी दारुने थैमान घातले आहे. या अवैध धंद्यातूनच पुण्यात विषारी दारुने २२ निष्पाप लोकांचे बळी घेतले आहेत. राज्याचा गृहविभाग 'पांडू हवालदार' चालवत असल्यामुळेच सगळीकडे बेबंदशाही माजली आहे, असा घणाघाती आरोप करत देवेंद्र फडणवीस यांनी याचे प्रायश्चित घेऊन राज्याला पूर्णवेळ सक्षम गृहमंत्री द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, पुण्यात विषारी दारुने २२ जणांचा बळी घेतल्यानंतर सरकारला जाग आली असून हातभट्या तोडण्याची कारवाई केली जात आहे. या हातभट्ट्या काही रात्रीतून उभ्या राहिलेल्या नाहीत. राज्यात ५०० शहरे व ४३ हजार गावखेडी आहेत, या ठिकाणी अवैध धंदे व हातभट्या राजरोस सुरु आहेत. गुजरातचे महाराष्ट्रात येणारे ड्रग्ज, जामतारा सारखे प्रकरण व अवैध धंद्याचे रॅकेट राजरोस सुरु असून त्याला गृहविभागाचा आशिर्वाद आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांचे 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रिद वाक्यच बदलले आहे. पुण्यातील प्रकरणाने सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात असल्याने स्वतःची अब्रु वाचवण्यासाठी आता कारवाईचे नाटक केले जात आहे.

चोर सोडून संन्याशाला फाशी…
गृहविभागाची चिरफाड करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, बुलढाणा जिल्ह्यात एक मुलगी बेपत्ता झाली, त्यानंतर पोलिसांना एक मृतदेह सापडला हा मृतदेह त्याच मुलीचा आहे हे समजून बेपत्ता मुलीच्या वडील व भावाला पोलिसांनी अटक करून बेदम मारहाण केली, त्यांच्याकडून कबुलीजबाब घेतला व आपण ४८ तासात प्रकरणाचा छ़डा लावला याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेतली पण त्यानंतर ती बेपत्ती मुलगी समोर आली. पोलिसांनी कशाचीही शहानिशा न करता हे प्रकरण हाताळले, हा सर्व प्रकार चोर सोडून सन्याशाला फाशी असा आहे. महाराष्ट्रात पोलीस विभागाचे काम असेच चालत आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण..
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, मराठा आंदोलनावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील वाशी येथे मध्यरात्री मनोज जरांगे पाटील यांना आरक्षण दिल्याचे जाहीर केले व गुलाल उधळला होता, त्यानंतर आझाद मैदानातील आंदोलनावेळीही गुलाल उधळला, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या दोन्ही आंदोलनावेळी मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिले होते ते जाहीर करावे. आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर जातनिहाय जनगणना करावी त्यातून मराठा समाजासह सर्वच समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो, असेही सपकाळ म्हणाले..

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Marathi