Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
निरामय संगीत सभेत प्रभातकालीन रागांची रंगली मैफल

निरामय संगीत सभेत प्रभातकालीन रागांची रंगली मैफल

पुणे : युवा पिढीतील आश्वासक गायिका श्रुती विश्वकर्मा, सुप्रसिद्ध गायक जयंत केजकर आणि ज्येष्ठ गायिका विदुषी मधुवंती देव यांनी गायलेल्या प्रभातकालीन रागांचा आनंद रसिकांनी भरभरून घेतला.

निमित्त होते डॉ. प्रकाश कुलकर्णी आयोजित निरामय संगीत सभेचे!

सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधन मंडळातील वि. का. राजवाडे सभागृहात रविवारी (दि. ३१) मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. मैफलीच्या सुरुवातीस संयोजक डॉ. प्रकाश कुलकर्णी यांनी 'परम विमल तुझे स्मरण' हे स्तवन सादर केले.

श्रुती विश्वकर्मा यांनी आपल्या मैफलीची सुरुवात राग अहिर भैरवमधील बडा ख्यालने केली. आपले परात्पर गुरू पंडित लक्ष्मणराव बोडस यांनी रचलेली 'तोरे करतार करो बेडा पार' ही रचना ऐकवून त्याला जोडून गुरू केदार बोडस यांची मध्यलय तीन तालातील 'कल ना परे मोहे तुम बिन' ही रचना प्रभावीपणे ऐकविली. त्यानंतर 'हु दोम तनन दोम' हा तराणा दमदार स्वरात सादर केला.

या नंतर जयंत केजकर यांची मैफल रंगली. राग गुजरीतोडी सादर करताना त्यांनी 'बन रे घर आज' ही बंदिश ऐकवून करून त्याला जोडून द्रुत लयीत 'जग के पालन हार' ही रचना ऐकविली. 'ए मापी संग खेले बन बन आज ऋत बसंत' ही रचना प्रभावीपणे सादर करून वसंत ऋतुतील वैशिष्ट्ये साकारली.

मैफलीची सांगता सुप्रसिद्ध गायिका विदुषी मधुवंती देव यांनी केली. त्यांनी राग देसकार ऐकविताना 'जब परदेस गवन' ही पारंपरिक बंदिश सादर करून द्रुत लयीत 'झांझरीया झनके झनके' ही पारंपरिक बंदिश ऐकविली. त्यानंतर गुरू राजाभाऊ देव यांनी रचलेल्या 'ना मोहे आस धन सुख जस' या अर्थपूर्ण बंदिशीने मैफलीची सांगता केली.

एकाहून एक सरस कलाकारांनी साकारलेल्या प्रभातकालीन रागांच्या सादरीकरणाने रसिक आनंदीत झाले.

कलाकारांना सुयोग कुंडलकर, कन्हैया भोसले (संवादिनी), चारुदत्त फडके, श्रीपाद शिरवळकर, अभिजित जायदे (तबला) यांनी साथसंगत केली. सुरुवातीस डॉ. प्रकाश कुलकर्णी यांनी मैफलीविषयी माहिती विशद केली. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ऋतुजा फुलकर यांनी केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Marathi