Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पार्किंग बंद, बाहेर दुचाकींवर दंड; एरंडवण्यातील व्यावसायिक इमारतीवरून खर्डेकर आक्रमक

पार्किंग बंद, बाहेर दुचाकींवर दंड; एरंडवण्यातील व्यावसायिक इमारतीवरून खर्डेकर आक्रमक

पार्किंग तातडीने खुले करण्याची महापालिकेकडे मागणी; तोपर्यंत ग्राहकांच्या दुचाकींवर कारवाई करू नये, संदीप खर्डेकर यांचे वाहतूक पोलिसांना पत्र

पुणे : एरंडवण्यातील पांडुरंग कॉलनीतील एका व्यावसायिक इमारतीची पार्किंगची जागा उपलब्ध करून दिली जात नसतानाच, इमारतीतील आस्थापनांमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या बाहेर उभ्या केलेल्या दुचाकींवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात असल्याचा आरोप क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केला आहे.

संबंधित पार्किंग तातडीने खुले करावे आणि तोपर्यंत नागरिकांच्या दुचाकींवर कारवाई करू नये, अशी मागणी त्यांनी पुणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडे केली आहे.

खर्डेकर यांनी यासंदर्भात पुणे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या मुख्य नगर अभियंत्यांना पत्र पाठविले आहे.

पार्किंगमध्ये साहित्य; नागरिकांना वाहने बाहेर लावावी लागत असल्याचा दावा

खर्डेकर यांच्या म्हणण्यानुसार, एरंडवण्यातील पांडुरंग कॉलनी, सर्व्हे क्रमांक 36/17 येथील व्यावसायिक इमारतीत झुडिओ, बँक आणि अन्य आस्थापना आहेत. मात्र या इमारतीसाठी असलेली पार्किंगची जागा संबंधित बांधकाम व्यावसायिकाने अद्याप खुली केलेली नाही.

पार्किंगच्या जागेत बांधकाम साहित्य व अन्य वस्तू ठेवण्यात आल्याचे त्यांनी पत्रासोबत दिलेल्या छायाचित्रांत दिसत आहे. पार्किंग खुले करण्यासाठी वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही प्रत्येक वेळी पंधरा दिवसांत साहित्य हलवून पार्किंग सुरू करण्याचे आश्वासन दिले जाते; मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा खर्डेकर यांचा आरोप आहे.

'पार्किंगच उपलब्ध नाही, मग नागरिकांवर दंड कशासाठी?'

इमारतीतील दुकानांमध्ये खरेदी किंवा अन्य कामासाठी येणाऱ्या नागरिकांना पार्किंग उपलब्ध नसल्याने वाहने बाहेर उभी करावी लागत आहेत. अशा परिस्थितीत वाहतूक पोलिसांकडून दुचाकींवर कारवाई केली जात असल्याबद्दल खर्डेकर यांनी आक्षेप घेतला आहे.

'एकीकडे संबंधित बांधकाम व्यावसायिक पार्किंग उपलब्ध करून देत नाही आणि दुसरीकडे तेथे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना वाहतूक पोलीस दंडित करतात,' असे खर्डेकर यांनी पत्रात म्हटले आहे.

पांडुरंग कॉलनीतील रहिवासीही या परिस्थितीमुळे त्रस्त असल्याचा दावा त्यांनी केला आहे. संबंधित बांधकाम व्यावसायिकाला महापालिकेने तातडीने पार्किंगची जागा खुली करण्याची तंबी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.

पार्किंगची जागा प्रत्यक्षात नागरिकांसाठी उपलब्ध होईपर्यंत तेथे येणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करू नये, अशी मागणीही खर्डेकर यांनी वाहतूक पोलिसांकडे केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Marathi