Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पावसाळी गटारे म्हणजे शहराची जीवनवाहिनी. ती बंद झाली की रस्तेच बनतात तलाव!

पावसाळी गटारे म्हणजे शहराची जीवनवाहिनी. ती बंद झाली की रस्तेच बनतात तलाव!

ऑपरेशन पावसाळी गटारे - भाग २

ड्रेनेज वेगळे… पावसाळी गटारे वेगळी; शहराच्या जलनिचरा व्यवस्थेचा हा महत्त्वाचा आधार

पुणे | शरद लोणकर

पावसाळा सुरू झाला की 'रस्त्यावर पाणी साचले', 'गटारे तुंबली', 'ड्रेनेज चोक झाले' अशा तक्रारी ऐकू येतात.

मात्र, या सगळ्या चर्चेत एक महत्त्वाची गोष्ट अनेकदा दुर्लक्षित राहते. शहरातील पावसाचे पाणी वेगाने बाहेर काढण्याचे काम करणारी पावसाळी गटारे (Storm Water Drain) ही शहराची जीवनवाहिनी आहेत.

जशी शरीरातील रक्तवाहिन्या सुरळीत असतील तर शरीर निरोगी राहते, त्याचप्रमाणे शहरातील पावसाळी गटारे कार्यक्षम असतील तर मुसळधार पावसातही शहराचा श्वास कोंडत नाही. पण ही व्यवस्था अडथळ्यांनी भरली, अपुरी पडली किंवा तिचे नियोजन चुकीचे झाले, तर काही मिनिटांच्या पावसानंतरही रस्ते तलावासारखे दिसू लागतात.

पावसाळी गटाऱ्यांचे मुख्य काम म्हणजे रस्ते, चौक, वसाहती आणि सार्वजनिक जागांवर साचणारे पावसाचे पाणी शक्य तितक्या कमी वेळात नैसर्गिक नाले, ओढे किंवा नदीकडे वळवणे. ही यंत्रणा नीट काम करत असेल तर पाणी तुंबण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होते.

मात्र, पावसाळी गटारे ही केवळ गाळ काढण्यापुरती मर्यादित व्यवस्था नाही. त्यांची क्षमता, उतार, रुंदी, जोडणारे नाले, आउटलेट आणि नियमित देखभाल या सर्व गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात. यापैकी एखाद्या घटकात अडथळा निर्माण झाला, तर पाण्याचा नैसर्गिक प्रवाह विस्कळीत होतो आणि त्याचा फटका नागरिकांना बसतो.

कॅच पिट, चेंबर, मॅनहोल, एसटीपी… पुणे मुंबईकरांनी समजून घ्यायलाच हव्यात या संज्ञा

१) पावसाचे पाणी शेवटी कुठे जायला हवे?

पावसाचे पाणी प्रथम रस्त्यावरील कॅच पिट किंवा इनलेटमध्ये जाते. तेथून ते पावसाळी गटाऱ्यांच्या जाळ्यात (Storm Water Drain) प्रवेश करते. पुढे हे पाणी मोठ्या गटाऱ्यांतून नैसर्गिक नाले, ओढे आणि अखेरीस नदीपर्यंत पोहोचते.

यामागचा उद्देश एकच — रस्त्यावर पाणी साचू नये.


२) Catch Pit म्हणजे काय?

रस्त्याच्या कडेला किंवा चौकात दिसणारी जाळी (Grating) असलेली छोटी रचना म्हणजे कॅच पिट.

याचे काम म्हणजे रस्त्यावरचे पावसाचे पाणी स्वीकारणे, तर त्यातील काही प्रमाणातील गाळ, प्लास्टिक, पाने यांसारखा कचरा अडवणे. कॅच पिट नियमित साफ न झाल्यास पाणी रस्त्यावरच साचू लागते.


३) Manhole आणि Chamber यात फरक काय?

Manhole (मॅनहोल):

  • प्रामुख्याने सांडपाणी (Sewer) वाहिन्यांवर असते.
  • देखभाल आणि दुरुस्तीसाठी प्रवेशद्वार म्हणून वापरले जाते.

Chamber (चेंबर):

  • विविध प्रकारच्या लाईनवर असू शकते.
  • पाण्याचा प्रवाह बदलणे, जोडणी करणे किंवा तपासणी करणे हा उद्देश असतो.

म्हणजे प्रत्येक चेंबर मॅनहोल नसते आणि प्रत्येक मॅनहोल पावसाळी गटाऱ्याचाच भाग असेलच असे नाही.

पुणे महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकातही पावसाळी गटाऱ्यांसाठी स्वतंत्र तरतुदी करण्यात आल्या आहेत. यावरून या व्यवस्थेचे महत्त्व स्पष्ट होते. मात्र, या कामांची अंमलबजावणी, देखभाल आणि परिणाम याचा वेध घेणारी 'ऑपरेशन पावसाळी गटारे' ही विशेष मालिका पुढे सुरू राहणार आहे.

(क्रमशः…)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Marathi