Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा; राजमाची परिसरात व इंगळून घाटात दरड कोसळली

पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा; राजमाची परिसरात व इंगळून घाटात दरड कोसळली

राजमाचीकडे जाणारा रस्ता बंद; जेसीबीच्या सहाय्याने हटविण्याचे काम सुरू, इंगळून घाटात एकेरी वाहतूक

आज दिनांक 04/07/2026 रोजी पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिलेला असून पुढील ३ तासांत भारतीय हवामान खात्याने आपल्या जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

तरी नागरिकांनी सतर्क राहावे व स्थानिक शासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. मंत्रालय, मुंबई. नागरिकांनी सतर्क रहावे. अशी माहिती सचेत अँप वरून देण्यात आली आहे.

पुणे | प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत असून, लोणावळा-राजमाची मार्गावरील कातळ धबधबा परिसरात तसेच जुन्नर तालुक्यातील इंगळून घाटात दरड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. प्रशासनाने तातडीने यंत्रणा घटनास्थळी पाठवून रस्ता सुरळीत करण्याचे काम सुरू केले आहे.

शनिवार (४ जुलै) दुपारी लोणावळा रोडकडून राजमाची किल्ल्याकडे जाणाऱ्या साईड रोडवर कातळ धबधबा शेजारी दरड कोसळली. दरडीमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड आणि माती आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. सध्या जेसीबीच्या सहाय्याने रस्ता मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, पर्यटकांनी या मार्गावर जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, जुन्नर पोलीस स्टेशन हद्दीतील इंगळून घाटात दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसामुळे दरड कोसळून दगड आणि माती रस्त्यावर आली. त्यामुळे घाटमार्गावर सध्या एकेरी वाहतूक सुरू असून, संबंधित विभागाला माहिती देण्यात आली आहे. रस्ता पूर्णपणे सुरक्षित झाल्यानंतरच वाहतूक पूर्ववत केली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवला असून, घाटमाथा, धबधबे आणि डोंगराळ भागात पर्यटनासाठी जाणे टाळावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यात ३ व ४ जुलै २०२६ रोजी झालेल्या पावसाचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केला असून, जिल्ह्यात सरासरी 24.5 मिमी पर्जन्यवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. घाटमाथा परिसरात मध्यम ते मुसळधार पाऊस झाला असून १८ महसूल मंडळांमध्ये ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे.

सर्वाधिक पाऊस वेल्हे तालुक्यात 90.2 मिमी झाला असून, त्यापाठोपाठ मावळ (64.5 मिमी), मुळशी (55.1 मिमी) आणि भोर (53.2 मिमी) तालुक्यांत चांगली पर्जन्यवृष्टी झाली आहे. पुणे शहरात 27.3 मिमी, खेडमध्ये 30.4 मिमी, हवेलीत 17.3 मिमी तर पुरंदरमध्ये 13 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

महसूल मंडळनिहाय पाहता आंबवणे (मुळशी) येथे 146.5 मिमी हा सर्वाधिक पाऊस नोंदविण्यात आला. तसेच वेल्हे मंडळात 166.3 मिमी, कुसूरगाव व लोणावळा परिसरात 87 मिमी, वडगाव मावळ, तळेगाव व ताकोवे बुद्रुक येथे 77.5 मिमी, तर भोर तालुक्यातील भोळवडे येथे 74 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

हवामान विभागाने घाट परिसरासाठी रेड अलर्ट दिला असून, नागरिकांनी नदी-नाले, धबधबे आणि डोंगराळ भागात जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रमुख तालुक्यांतील पर्जन्यमान (मिमी)

  • वेल्हे - 90.2
  • मावळ - 64.5
  • मुळशी - 55.1
  • भोर - 53.2
  • खेड - 30.4
  • पुणे शहर - 27.3
  • हवेली - 17.3
  • पुरंदर - 13.0
  • जुन्नर - 10.8
  • आंबेगाव - 10.7
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Marathi