Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे माझी कर्मभूमी; पुरस्कार कौतुकाची थाप : अमृता खानविलकर

पुणे माझी कर्मभूमी; पुरस्कार कौतुकाची थाप : अमृता खानविलकर

टरंग ॲकॅडमी आयोजित कलागौरव, सामाजिक कृतज्ञता पुरस्कारांचे वितरण

पुणे : पुणे ही माझी कर्मभूमी आहे. मी पुण्यात आले नसते तर कलेच्या क्षेत्रातही आले नसते. यासाठी पुणेकरांना मानाचा मुजरा करते.

नटरंग प्रतिष्ठानचा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी घरच्या मंडळींनी पाठीवर दिलेली कौतुकाची थाप आहे. माझ्या कलाक्षेत्रातील कार्याला मिळालेली पोचपावती पुढच्या वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरेल, अशा भावना लोकप्रिय अभिनेत्री, नृत्यांगना अमृता खानविलकर यांनी व्यक्त केल्या.

नटरंग ॲकॅडमीतर्फे दिल्या जाणाऱ्या ३२व्या स्व. शाहीर मधू कडू स्मृती नटरंग प्रतिष्ठान कलागौरव पुरस्काराने अमृता खानविलकर तर चौथ्या स्वर्गीय गिरीश बापट स्मृती नटरंग प्रतिष्ठान सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने गणेशभक्त, सामाजिक कार्यकर्ते शिरीष मोहिते यांचा आज (दि. २९) गौरव करण्यात आला. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना खानविलकर बोलत होत्या. पुरस्कारांचे वितरण आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते झाले.

उपमहापौर परशुराम वाडेकर, नटरंग ॲकॅडमीच्या अध्यक्षा, नगरसेविका स्वरदा बापट, कार्याध्यक्ष जतिन पांडे, अभिनेत्री प्राजक्ता माळी, दीपक मानकर, राघवेंद्र मानकर, कुणाल टिळक, ललित जैन, नितीन पंडित, विजय कडू, राजेश येनपुरे, दत्ता सागरे आदी उपस्थित होते. बालगंधर्व रंगमंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाल, श्रीफळ, तुळशीचे रोप, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, मानाचा फेटा आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते.

पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्ताने नटरंग कला ॲकॅडमीच्या १२५ गुणवान कलाकारांचा नृत्य, संगीत आणि विनोदावर आधारित 'नृत्यरंग' हा बहारदार कार्यक्रम सादर झाला. रसिकांनी भरभरून दाद देत कार्यक्रमाचा आनंद घेतला.

शिरीष मोहिते म्हणाले, गणेश मंडळासाठी कार्य करीत असताना मी सामाजिक क्षेत्रात रमलो. परमेश्र्वराची साथ मिळाल्याने माझ्या हातून समाजकार्य घडत आहे. नटरंग संस्थेच्या माध्यमातून कला क्षेत्रात उत्तम पिढी घडविण्याचे कार्य होत आहे, हे कौतुकास्पद आहे. सामाजिक कार्यकर्ता या नात्याने मिळालेला पुरस्कार माझ्या गणेश मंडळातील सर्व कार्यकर्त्यांना कुटुंबियांना समर्पित करतो आहे. गिरीश बापट यांच्या सामाजिक कार्याविषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

आमदार हेमंत रासने म्हणाले, शिरीष मोहिते हे गणेश मंडळाच्या व्यासपीठाद्वारे सामाजिक कार्यात ठसा उमटविण्याचे काम करीत आहेत, त्याचप्रमाणे कलेच्या माध्यमातून रसिकांवर मोहिनी घालण्याचे काम अमृता खानविलकर करीत आहेत. नटरंग संस्थेतर्फे दिल्या गेलेल्या पुरस्काराने त्यांच्या कार्याला न्याय दिला गेला आहे.

दीपक मानकर यांनी सांगितले की, अमृता खानविलकर कलेच्या क्षेत्रातून समाजाच्या अंतर्मनात अमृत पोहोचवित आहेत. तर शिरीष मोहिते सामाजिक वसा जपणारे कार्यकर्ते असून गणेश मंडळाच्या मार्फत समाजाचे दु:ख दूर करत त्यांचे हित जपण्याचे मोलाचे कार्य करीत आहेत. नटरंगच्या माध्यमातून जतिन पांडे गेली ३२ वर्षे सातत्याने समाजाला दिशा दर्शवित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम करीत आहेत.

प्राजक्ता माळी यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागतपर प्रास्ताविकात जतिन पांडे यांनी संस्थेच्या कार्याविषयी तसेच पुरस्कारांविषयी माहिती दिली. आभार स्वरदा बापट यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय गोगले यांनी केले. मान्यवरांचे स्वागत स्वरदा बापट, जतिन पांडे यांनी केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Marathi