Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुण्यातील खड्डे म्हणजे भ्रष्टाचाराचे अड्डे - मुकुंद किर्दत

पुण्यातील खड्डे म्हणजे भ्रष्टाचाराचे अड्डे - मुकुंद किर्दत

पावसाळा संपत आला तरी कामांना उशीर; १६ कोटींची कामे विनानिविदा देण्याच्या निर्णयावर आम आदमी पार्टीचा सवाल

पुणे: पुणे शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, यावरून आम आदमी पार्टीने पुणे महानगरपालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर तीव्र टीका केली आहे.

'दरवर्षी पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण झाल्याचे प्रशासन सांगते, मात्र प्रत्यक्षात पावसाळा सुरू झाला की पुणेकरांना खड्डे, पाणी तुंबणे, अपघात आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यंदा तर पावसाळा संपत आला तरी प्रशासन जागे झालेले नाही,' असा आरोप आम आदमी पार्टी महाराष्ट्रचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केला आहे.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्ती आणि संबंधित कामांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित असताना, यंदा ती वेळेत न झाल्याचा दावा किर्दत यांनी केला. आता सुमारे १६ कोटी रुपयांची कामे निविदा न काढता थेट देण्याचा निर्णय घेतला जात असल्याचा आरोप त्यांनी केला असून, 'इतक्या उशिरा प्रशासन जागे होण्याला जबाबदार कोण?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

पुण्यातील रस्त्यांची दुरवस्था, खड्डे आणि पावसाळ्यातील पाणी तुंबण्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगत किर्दत म्हणाले की, 'दरवर्षी दहा-पंधरा दिवसांत खड्डे बुजवण्याची आश्वासने दिली जातात. मात्र अनेक वर्षांपासून हीच परिस्थिती कायम आहे. पुणे महानगरपालिकेने या अनुभवातून कोणताही धडा घेतलेला दिसत नाही.'

निविदा प्रक्रिया वेळेत न होण्यामागे काही नगरसेवकांचा ठराविक ठेकेदारांना कामे देण्यात असलेला कथित रस कारणीभूत असल्याचा आरोपही किर्दत यांनी केला. तसेच, 'नगरसेवकांकडून २० टक्के कमिशनची मागणी होत असल्याची चर्चा आहे,' असा दावा त्यांनी केला. मात्र या आरोपांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही.

सत्ताधारी भाजप, सर्वपक्षीय नगरसेवक, प्रशासन आणि ठेकेदार यांच्यात संगनमत करून कामे विनानिविदा देण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप करत किर्दत यांनी या प्रक्रियेची पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली.

'पुणेकरांच्या त्रासाला सत्ताधारी आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. पुण्यातील खड्डे हे आता खऱ्या अर्थाने भ्रष्टाचाराचे अड्डे झाले आहेत,' अशी टीका किर्दत यांनी केली.

तसेच पुणे महानगरपालिकेतील या कारभारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोणताही वचक दिसत नसल्याची टीकाही त्यांनी केली. 'बैल गेला आणि झोपा केला, अशी सत्ताधाऱ्यांची अवस्था झाली आहे,' असा टोला त्यांनी लगावला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Marathi