Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सामुदायिक वैगुण्यामुळे महाराष्ट्राची स्थिती बिहारसारखी : डॉ. राजा दीक्षित

सामुदायिक वैगुण्यामुळे महाराष्ट्राची स्थिती बिहारसारखी : डॉ. राजा दीक्षित

. भा. मराठी प्रकाशक संघातर्फे अनिल टांकसाळे यांचा जीवनगौरव तर डॉ. न. म. जोशी यांचा साहित्यसेवा पुरस्काराने गौरव

पुणे : आज महाराष्ट्राची स्थिती बिहारसारखी झाली आहे. यात कुणी एक सरकार, राजकीय शक्ती जबाबदार नसून हे सामुदायिक वैगुण्य आहे.

सर्व समाजच या स्थितीला जबाबदार आहे. समाजजीवन तसेच राजकारणाची आज अवनिती झाली असून सर्व वातावरण गढुळलेले आहे. समाजात गुन्हेगारी वाढीस लागली आहे; कोयतेशाही सुरू झाली आहे, अशी परखड टीका इतिहास तज्ज्ञ डॉ. राजा दीक्षित यांनी केली. बिघडलेल्या सामाजिक परिस्थितीत विचार हेच शस्त्र, सदाचार हाच मार्ग आणि मानवता हाच धर्म आशादायी ठरणार आहे. साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांच्या माध्यमातूनच समाजप्रबोधन होऊ शकेल त्यामुळे अशा स्वरूपाचे उपक्रम हे आशेचा किरण ठरत आहेत, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे जीवनगौरव पुरस्काराने अनिल बुक एजन्सीचे संचालक अनिल टांकसाळे तर साहित्यसेवा पुरस्काराने ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी, ज्येष्ठ लेखिका डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी यांचा स्नेहनिहार पुरस्कराने तर ज्येष्ठ मुद्रितशोधक विजय सरदेशपांडे यांचा आज (दि. ३०) विशेष सन्मान करण्यात आला. पुरस्कारांचे वितरण इतिहासतज्ज्ञ डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, उपाध्यक्ष दत्तात्रट पाष्टे, प्रमुख कार्यवाह पराग लोणकर मंचावर होते. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, टिळक रोड येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीसाठी आणि दिवाळी अंक निर्मितीसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले. शाल, श्रीफळ, मानपत्र आणि सन्माचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

डॉ. राजा दीक्षित पुढे म्हणाले, अनिल टांकसाळे यांच्या व्यवसायात निष्ठेची जोड असल्याने त्यांच्या ग्रंथविक्री कार्याचा उचित गौरव झाला आहे. डॉ. न. म. जोशी हे माझ्यासाठी पितृतुल्य असून त्यांनी साहित्यक्षेत्रात विविधांगी साहित्यनिर्मिती करून सेवा केली आहे. खडतर प्रवासातून त्यांनी कर्तृत्व घडविले आहे. संशोधकीय, साहित्यिक, ललित लेखनासह बोधकथा हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. नर्मविनोदाचे अंग असलेल्या डॉ. न. म. जोशी यांनी साहित्य क्षेत्रात प्रसन्नतेचा शिडकावा केला आहे. स्नेहसुधा कुलकर्णी या फक्त प्रकाशिका नव्हेत तर लेखिका-कवयित्री आणि संपादिका देखील आहेत. प्रकाशन व्यवसायात कर्तृत्व गाजविणाऱ्या महिलेचा हा अर्थपूर्ण सत्कार आहे. मुद्रितशोधक हा अक्षरवाङ्‌मय वाचकांपर्यंत पोहाचविणारा दुवा असतो. त्यामुळे विजय सरदेशपांडे यांचा सत्कार होणे अभिनंदनीय आहे. प्रकाशक संघाच्या उपक्रमशील कार्याचे डॉ. दीक्षित यांनी कौतुक केले.

सत्काराला उत्तर देताना अनिल टांकसाळे म्हणाले, मी माझा व्यवसाय प्रामाणिकपणे केला आहे, आणि आजही करतो आहे. साहित्याची नगरी, पंढरी, माहेरघर असलेल्या पुण्यात माझा सन्मान होणे आनंददायी आहे. आज पुस्तकविक्री क्षेत्रात आयाम बदललेले आहेत. दुकाने, ग्रंथालये ओस पडत आहेत, वाचकांपर्यंत पुस्तके पोहोचविणे दुरापास्त होत आहे. अशा परिस्थितीत या पुरस्काराच्या माध्यमातून नेटाने, जोमाने कार्य करण्यास मला प्रोत्साहन मिळाले आहे तसेच प्रकाशक संघाचे सहकार्य लाभत आहे.

कृतज्ञता शब्दाला प्रकाशक संघाने मान्यता दिली आहे, असे सांगून डॉ. न. म. जोशी म्हणाले, ज्या प्रकाशकांकडे माझी पुस्तके प्रकाशित झाली नाहीत त्यांनीही मला लेखक म्हणून आज स्वीकारले आहे. बदललेल्या सामाजिक काळात मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी उर्जादायक आहे.

डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.

स्वागतपर प्रास्ताविकात राजीव बर्वे यांनी पुरस्कारांविषयी माहिती सांगून प्रकाशक संघाच्या कार्याविषयी अवगत केले.

मानपत्राचे वाचन किरण आचार्य यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुर बर्वे यांनी केले तर आभार नितीन हिरवे यांनी मानले.

'देठ त्याचा अजूनही प्रदीप हिरवाच आहे'….

पुरस्कार वितरण समारंभानिमित्त प्रदीप निफाडकर यांच्या गझलांचा कार्यक्रम रंगला. त्या वेळी डॉ. न. म. जोशी यांच्याविषयी 'हे उन्हाने वाळलेले पान आहे, वृद्ध नाही अनुभवांचे रान आहे' अशा ओळी त्यांनी उद्‌धृत केल्या. या ओळीचा संदर्भ घेऊन डॉ. न. म. जोशी यांनी ज्येष्ठ गझलकार सुरेश भट माझ्याविषयी काय म्हटले असते असे सांगताना 'हे उन्हाने वाळलेले पान आहे; देठ त्याचा अजूनही प्रदीप हिरवाच आहे' अशा शब्दात निफाडकर यांच्या गझलेला उत्स्फूर्तपणे उत्तर दिले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Marathi